मुंबई-पुणे महामार्गावर दुचाकींचे दोन अपघात

0

देहूरोड: मुंबई-पुणे महामार्गावर शेलारवाडी येथे एमईएस पंपहाऊस समोर दुचाकी घसरून रस्त्यावर पडलेल्या दोन दुचाकीस्वारांपैकी एक भरधाव मोटारीखाली चिरडून ठार झाला. या अज्ञात वाहनात अडकून त्याचा मृतदेह सुमारे तीनशे फुटांपर्यंत फरफटत गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यात पडलेला मृतदेह पाहून मागून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे दुसरा अपघात झाला. या अपघातात मागील आसनावर बसलेला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अवघ्या काही मिनिटांच्या अंतरात हे दोन्ही अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

…मृतदेह 300 फूट फरफटत नेला
शहाबाज राजमहंमद डोंगरे (वय 31, रा. मुंबई) असे पंपहाऊस समोर झालेल्या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून तो दुचाकीचालकाच्या मागे बसून प्रवास करीत होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दुचाकीवरील दोन्ही स्वारांनी कसल्या तरी अंमली पदार्थाचे सेवन केले असावे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दुचाकी घसरून दोघे खाली पडले. त्यात डोंगरे याच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. या वाहनात कपडे अडकल्यामुळे मृतदेह सुमारे तीनशे फुटांपर्यंत फरफटत गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मृतदेहापासून अपघाताचे ठिकाण दूर असल्यामुळे मृतदेह नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेने केवळ मृतदेह उचलून नेला. पण अपघातस्थळी त्याच्या शरीराचे काही अवयव विखुरलेल्या अवस्थेत सकाळपर्यंत पडून होते.

…मृतदेहपाहून दुसरा अपघात
या अपघातानंतर मृतदेह काहीवेळ रस्त्यात पडून होता. दरम्यान हा मृतदेह पाहून घाबरल्यामुळे आणखी एका दुचाकीस्वाराचा येथून काही अंतरावर एमएच हॉस्पिटल जवळ अपघात झाला. त्यात महेंद्र अज्ञान वायदंडे (वय 22, रा. उल्हासनगर, कॅम्प नं. 45, कल्याण) हा गंभीर जखमी झाला. येथील खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून तत्काळ जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर वायदंडे बेशुध्द झाला असला तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचा सहप्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.

…जखमीवर शर्थीचे उपचार सुरू
दरम्यान, पहिल्या अपघातातील मृत्यू झालेला डोंगरे याच्याकडे पोलिसांना मिळालेल्या चालक परवान्यावरुन त्याची ओळख पटविली आहे. त्याच्या मोबाईल फोनमधील क्रमांकांवरुन नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दुसर्‍या अपघातातील जखमी वायदंडे हा कल्याण येथे पाणी टँकरवर कामाला आहे. दुचाकीवरुन मित्रासह तो पंढरपूर या आपल्या गावी जात असताना हा अपघात झाला. त्याच्यावर येथील आधार रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.