मुंबई-पुण्यातील अघोरी शक्तीने डीएसके बरबाद

0

शिवसेनेचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

मुंबई : सध्या कारागृहात असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या बरबादीमागे मुंबई-पुण्यातील अघोरी शक्ती आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्याबाबत एक शब्दही न काढणारी ही अघोरी शक्ती मराठी उद्योगपतीच्या मागे हात धुऊन लागली आहे. डीएसकेंनी आतापर्यंत सचोटीने काम केले. मल्ल्या-मोदींप्रमाणे पळून न जाता ते इथेच राहिले. एका प्रतिष्ठित व प्रेरणादायी उद्योगपतीची ही धूळधाण क्लेशदायक आहे, असा आरोप शिवसेनेने सामना या मुखपत्रातून केला आहे.

अनेक उद्योजक देशोधडीला लागले
सामनातून सरकारवर निशाणा साधताना शिवसेनेने म्हटले आहे की, देशात मोदींचे राज्य आल्यापासून व नोटाबंदीचे तांडव सुरू झाल्यापासून आर्थिक मंदीची लाट उसळली आणि त्यात डीएसकेच नव्हे तर अनेक उद्योजक देशोधडीला लागले आहेत. डीएसकेंच्या अधोगतीस नोटाबंदीही कारणीभूत आहे. बांधकाम व्यवसायात डीएसके हे प्रतिष्ठेचे नाव होते. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक मंदीची लाट उसळली. त्यात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. घराची विक्री मंदावली. डीएसके समूहाची एकूण मालमत्ता ही 9 हजार 124 कोटी रूपयांची तर कर्ज 1500 कोटींचे आहे.

भाजपमधील तरूणांची संपत्ती वाढली
भाजपा परिवारातील तरूण वर्गाची संपत्ती वर्षभरात सोळाशे किंवा सोळा हजार पटीने वाढते, त्यावर संशोधन होत नाही. पण डीएसके व इतरांच्या बाबतीत त्यांचा नागोबा भ्रष्टाचारमुक्तीचा फणा काढतो. डीएसकेंचे कोणी ऐकायला तयार नाही. यावेळी सरकारी वकिलावरही टीका केली. डीएसकेंनी अत्यंत थंड डोक्याने फसवणूक केल्याचे न्यायालयात सांगून सरकारी वकिलांनी शब्दांचे चांगले तारे तोडले आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे इतर ठिकाणी गुंतवणे नोटाबंदीमुळे अंगलट आल्याचेही शिवसेनेने म्हटले. डीएसकेंची मालमत्ता विकली जाऊ नये व डीएसके पूर्ण बरबाद व्हावेत यासाठी काही अघोरी शक्ती मुंबई-पुण्यात कार्यरत होत्या. हे अघोरी लोक फक्त मराठी लोकांच्या मागे लागले आहेत, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.