बाजार समिती सभापतींसह राष्ट्रवादी गटनेत्यांची प्रशासनाकडे मागणी
भुसावळ : देशभरात थैमान घालणार्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात पाय पसरल्याने जनतेत भीतीचे वातावरण आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पुणे, मुंबई येथून येणार्या खाजगी ट्रॅव्हल्स तसेच एस.टी.बसेसमधून येणार्या प्रवाशांची आधी वैद्यकीय चाचणी करावी व नंतरच त्यांना घरी सोडण्यात यावे, अशी मागणी बाजार समिती सभापती सचिन चौधरी व राष्ट्रवादीचे गटनेता दुर्गेश ठाकूर यांनी प्रांताधिकारी प्रशासनाकडे गुरूवारी केली आहे. राज्य परीवहन महामंडळाच्या साध्या, निमआराम तसेच शिवशाही बसेस मुंबई, पुण्याहून भुसावळ ते यावल, रावेर असा प्रवास करतात मात्र बाहेर गावाहून येणार्या प्रवाशांची आरोग्य चाचणी झाल्यास रोगाचा फैलाव रोखता येणार आहे. भुसावळ शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.