मुंबई, पुण्यासह राज्यात मान्सून दाखल

0

मुंबई/पुणे । कोकण पाठोपाठ मान्सूनचे मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात आगमन झाले आहे. मुंबई, उपनगरात सोमवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक भागातही जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुण्यासह परिसरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. आजचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असून त्याने जोर धरला असल्याचे हवामान खात्याचे डॉ.चट्टोपाध्याय यांनी सांगितले आहे. येत्या 24 तासांत मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. मुंबई, ठाणे कोकण परिसरात पाऊस बरसल्याने उन्हापासून नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

48 तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
दोन दिवसांपूर्वी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने आगेकूच करत मध्य महाराष्ट्र, कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसंडी मारली. सह्याद्री डोंगरमाथ्यावर मान्सूनचे आगमन झाल्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागासह मराठवाड्यात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे.

कोकणात पावसाने शंभरी ओलांडली
तेलंगणा, आंध्र तसेच ईशान्येकडील राज्यांमध्येही मान्सून आणखी मजल मारेल, असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. रविवारी मान्सूनरेषा श्रीवर्धन (रायगड), महाबळेश्वर (सातारा), विजापूर (कर्नाटक), कुमूल, ओंगोल (आंध्र प्रदेश) या गावांपर्यंत पोचली होती. मान्सूनच्या आगमनामुळे गोवा आणि कोकणपट्टीवर रविवारी जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड येथे राज्यातील सर्वाधिक दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकणातील हर्णे, तळा तसेच जळगाव येथेही पावसाने शंभरी ओलांडली आहे.

राज्यात गारवा निर्माण झाला
दुसरीकडे कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, परभणी, नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे राज्यात गारवा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली होती.