मुंबई । मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 6 कोटी 15 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी हेरॉईन तस्कराला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी हेरॉईन या अमली पदार्थाच्या विरोधात केलेली आतापर्यंतची मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने शनिवारी ही कारवाई केली आहे.
राजस्थानातील अमली तस्कर माटुंगा पश्चिम परिसरातील उद्देशीय चिकस्तालाय येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. या कारवाईत मांगीलाल काजोडमल मेघावाल (40) या तस्कराला रंगेहात पकडण्यात आले. मेघावाल हा मूळचा राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील सुकेत या गावचा रहिवासी आहे. या आरोपीकडून पोलिसांनी 4 किलो 100 ग्राम हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 6 कोटी 15 लाख रुपये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हेरॉईन मुंबईत कोणाला देण्यासाठी हा आरोपी आला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलिसांनी या संदर्भात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.