धुळे । शहरातील बसस्थानक परिसरात व्यापार्यास पोलीस असल्याचे भासवून वाहनात कोंबून नेणार्या व लूट करून सोडून दिल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी चौकशी पथके नेमीत या गुन्ह्याचा तपास सुरु केला. पथकाने मुंबईतून पोलिसासह चौघांना जेरबंद करीत लूटीच्या वाहनासह धुळ्यात आणल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे यांनी दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिलीप गांगुर्डे व शोध पथकातील पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तीन तपास पथके
जिल्हा पोलीस अधिक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिलीप गांगुर्डे यांना मार्गदर्शक सूचना करीत तपास पथके नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानूसार उपनिरिक्षक स्वप्निल राजपूत, हेकॉ. किरण जगताप, पोकॉ. योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे यांच्या पथकाला हायवे टोलनाक्याजवळील फूटेज चेक करण्यासाठी ठाणे-मुंबई येथे पाठविले. तर तपासी अधिकारी उपनिरिक्षक आटोळे, हेकॉ. भामरे, पोना. दिनेश परदेशी, विनायक सोनवणे, मुक्तार मन्सुरी, पोकॉ. संदीप पाटील, संजय जाधव यांच्या पथकाला शहरातील सीसीटिव्ही फूटेज व गुन्हेगार शोधाचे काम सोपविले गेले. तसेच तिसरे पथक उपनिरिक्षक आखाडे, असई बैरागी, हेकॉ. मिलींद सोनवणे, खैरनार, पोना. प्रल्हाद वाघ, दिनेश वाघ, पोकॉ. दामोदर यांनाही गुन्हेगार शोधाची जबाबदारी देण्यात आली.
असा लावला तपास..
उपनिरिक्षक स्वप्निल राजपूत यांच्या पथकाने सीसीटिव्ही फूटेज, सायबर सेलचे हेकॉ. संजय पाटील व धुळ्यातील पथकाने दिलेली माहिती या आधारे मुंबई स्थानिक पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यात वापरलेली एम.एच.02/ ए.यु.9480 ही इनोव्हा कार शोधून काढली. तसेच या गुन्ह्यात म्होरक्या असलेल्या व जोगेश्वरी पुर्वत राहणार्या मुंबई पोलिसातील हेकॉ. संजय देवराम पवार (50) रा. म्हाडा पोलीस क्वॉर्टर, प्रथमेश पांडूरंग खनवेकर (24) रा. इंदिरानगर, विजय मनोहर चंदणे (29) रा. कल्याणी इंदिरानगर व प्रविण सुरेश सावंत (33) रा. शिवसागर चाळ, महाराष्ट्र नगर अशा चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील 11 लाख 56 हजारांच्या रोकडसह 12 लाखांची इनोव्हा कार मिळून 23 लाख 56 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या चौघांना अटक करून कारसह धुळ्यात आणले असून या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्हीबाजूकडील युक्तीवाद ऐकून चौघा आरोपींना 25 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अशी घडली घटना
गुजरातमधील उमियानगर मोढेरा येथील रहिवासी असलेले व्यापारी सध्या जळगावमधील ईश्वर कॉलनीत वास्तव्याला आहेत. 16 मे रोजी ते जळगाव-नंदुरबार बसने पहाटे 5.30 वाजता धुळे बसस्थानकावर उतरले. त्यानंतर 7 च्या सुमारास ते सुरत बसमध्ये चढत असता पोलीस असल्याचे भासवून दोघांनी त्यांना बसखाली उतरविले. तसेच चौकशीच्या नावाखाली बसस्थानकाच्या गेटजवळ उभ्या असलेल्या इनोव्हा कारमध्ये कोंबले. यावेळी कारमध्ये आणखी दोघे होते. या चौघांनी अमरतभाई पटेल यांना नगाव रोडने तिसगाव-ढंढाणे शिवारात नेवून त्यांच्या जवळील 28 लाख 10 हजारांची रोकड लूटली. शिवाय त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून त्यातील सीमकार्ड व बॅटरी काढून घेत हॅण्डसेट त्यांना परत केला. तसेच त्यांना गाडीखाली उतरवून या चौघांनी गाडीसह पळ काढला.