मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू – डोसाचा उद्या निकाल लागणार

0

मुंबई । मुंबईतील 12 मार्च 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी मंगळवारी अंडरवर्ल्डचे कुख्यात गुंड अबू सालेम, मुस्तफा डोसा आणि इतर आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. बॉम्बस्फोटाचा कट रचणे, घातक हत्यारे पुरवणे, बॉम्बस्फोट घडवून आणणे, लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, खून, खुनाचा प्रयत्न करणे यांसारखे गंभीर आरोप अबू सालेमवर ठेवण्यात आलेत.

तर, बॉम्बस्फोटाचा दुबईत कट रचणे, कटासाठी माणसांची जुळवाजुळव करून त्यांना ट्रेनिंगकरिता पाकिस्तानात पाठवणे, लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, खून, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे मुस्तफा डोसावर ठेवण्यात आलेत. सध्या मुस्तफा डोसा हा मुंबईतील आर्थर रोडमध्ये राहून तर अबू सालेम नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये आहेत.

11 नोव्हेंबर 2005 ला अबू सालेमला पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आले. सालेमच्या प्रत्यार्पण संधीनुसार पोर्तुगाल सरकारने त्याला फाशीची शिक्षा देण्यास मनाई केलीय. त्यामुळे त्याला याही प्रकरणात जास्तीत जास्त जन्मठेपेचीच शिक्षा सुनावली जाऊ शकते. सध्या प्रदीप जैन हत्याप्रकरणी अबूला जन्मठेप देण्यात आलीय.