मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी अबू सालेमला जन्मठेप द्या; सीबीआयची मागणी

0

मुंबई । 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी सीबीआयने टाडा न्यायालयात केली आहे. आता सीबीआयच्या मागणीवर न्यायालय काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका खटल्याच्या दुसर्‍या टप्प्यात विशेष ‘टाडा’ न्यायालयात सुनावणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने आरोपी मुस्तफा डोसा, अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवले, तर एकाची निर्दोष मुक्तता केली होती. बॉम्बस्फोटाचा कट रचणे, तो कट अमलात आणून शेकडो निष्पापांची हत्या करणे वा हत्येचा कट रचल्याच्या प्रमुख आरोपांमध्ये या सर्वांना दोषी ठरवण्यात आले होते. मुस्तफा डोसा, अबू सालेमसह पाचजणांना काय शिक्षा व्हावी यावरुन सीबीआयकडून न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. यातील मुस्तफा डोसाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. अबू सालेमवगळता उर्वरित आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. तर सालेमचे प्रत्यार्पण करताना त्याला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, अशी अट पोर्तुगाल सरकारने घातली होती. त्यामुळे सालेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्यामुळे सीबीआयने सालेमला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

कटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनसह खटल्यातील 33 आरोपी अद्यापही फरार असल्याने सालेमच्या निकालासह खटल्याचाही हा शेवटचा निकाल असण्याची शक्यता आहे. दरम्यान, जगातील हा पहिला दहशतवादी हल्ला होता, ज्यामध्ये ‘आरडीएक्स’सारख्या स्फोटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. दुसर्‍या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर करण्यात आला होता, असा दावा सीबीआयने न्यायालयात केला होता.