मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण : निकाल आणि धडा

0

25 वर्षांनंतर न्याय मिळाला25 वर्षांनंतर न्याय मिळाला1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने कुख्यात डॉन अबु सालेम याला जन्मठेपेची तर ताहिर मर्चंट व फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी याच न्यायालयाने सदर खटल्यातील पहिल्या भागात याकुब मेमन याला 2015 मध्ये फाशीची शिक्षा दिली होती. 1992 साली कट्टर हिंदुत्ववादी संघटना व पक्षांनी बाबरी मशिद पाडली होती. या घटनेमुळे मुस्लिम धर्मातील काही जण संतप्त झाले. या घटनेचा बदला घेण्यासाठी 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट करण्याचा निर्णय कुख्यात गँगस्टर दाउद इब्राहिम, टायगर मेनन, याकुब मेनन, आबु सालेम, मुस्तफा डोसा अशा अनेक जणांनी घेतला. त्यानुसार परदेशातून आरडीएक्स, बंदुका, बॉम्ब असे साहित्य मुंबईत अनेक मार्गांनी आणले. या प्रकरणात अभिनेता संजय दत्तलाही एके -56 रायफल बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

या प्रकरणी संजय दत्तने शिक्षाही भोगलेली आहे. मुंबईत धर्मांधांनी केलेल्या बॉम्बस्फोटात विविध ठिकाणी 257 नागरिकांचा बळी गेले तर 713 जण जायबंदी झाले. यातील काहींचे आयुष्य कामातून गेले. या प्रकरणात 100 च्या वर आरोपी सामील होते. न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. मुंबईत 12 ठिकाणी झालेल्या स्फोटांमुळे देशभरात खळबळ माजली होती. या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार परदेशात असल्याने त्यांना पकडणे ही तपास यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. तरीही खबरयांच्या नेटवर्कमार्फत देशातील बॉम्बस्फोट घडवणारया गुन्हेगारांना शोधून काढण्यात यंत्रणेला यश आले. या प्रकरणातील नव्वद टक्के आरोपींची धरपकड करून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांना आता 25 वर्षांनंतर न्याय मिळाला, असे म्हणता येईल. पण झालेले नुकसान कोणत्याही परिस्थितीत भरून निघत नाही. 1993 साली मुंबईत घडवण्यात आलेल्या भीषण बाँम्बस्फोटामुळे मुंबईतील लोकजीवन भीतीच्या छायेत वावरत होते. मुंबई व देशातील जनजीवन डळमळीत करण्याचा दंगेखोरांचा डाव होता तसेच देशातील अर्थव्यवस्थेला फटका बसवणे हाही एक उद्देश दंगेखोरांचा होता.न्यायालयाने सीबीआयचे हे म्हणणे मान्य केले. सुरूवातीला 100 संशयितांविरोधात खटला चालवला गेला. त्यात अनेक जणांची सबळ पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. त्यानंतर प्रमुख सात सूत्रधारांविरोधात खटला चालवला गेला. या प्रकरणी याकुब मेनन याला 2015 साली फाशी देण्यात आले. आता बॉम्बस्फोटाला 25 वर्षे झाली आहेत. तब्बल 25 वर्षांनंतर सदर खटल्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला आहे. मुंबईचे जनजीवन उध्वस्त करणारया दंगेखोरांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. परंतु या प्रकरणाचा खरा सूत्राधार दाउद इब्राहिम व टायगर मेमन अजुनही सापडलेले नाहीत. या प्रकरणातील कुख्यात दाउद इब्राहिमवर इंटरपोलचा वॉच आहे. त्याची आर्थिक कोंडी करण्यात आली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणाचे नियोजन करणाऱया देशांतर्गत स्थानिक गुन्हेगारांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तरीही आपल्या देशात राहून देशातील सार्वजनिक संपत्तीचा नाश करण्याची प्रवृत्ती बळावत आहे, ही मोठी खंत आहे. अशा राष्ट्रद्रोही लोकांना वेळीच ओळखून त्यांच्यावर तपास यंत्रणांनी कडक लक्ष ठेवण्याची गरज आहे. हे आपल्या अस्तनीतले निखारे आहेत, असे म्हणता येईल. देशाच्या प्रगतीला बाधक ठरणाऱया या विषवल्ली वेळीच नष्ट केल्या नाही तर देशात अस्थिरता माजेल

मुंबई येथे झालेल्या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याचा निकाल विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश जी. डी. सानप यांनी गुरूवारी निकाल दिला. त्यांनी आबू सालेम, ताहिर मर्चंट, मुस्तफा डोसा, करिमुल्ला खान, फिरोज अब्दूल रशिद खान यांना बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवले. गुन्हेगारी कट रचणे, देशाविरोधात गुन्हेगारी कारवायांसह शस्त्रास्त्रे बाळगणे यासाठी आबू सालेमला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर  आबू सालेमसहीत मुस्तफा डोसा, ताहिर मर्चंट, करिमुल्ला खान यांना सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे यासाठी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यातील ताहिर मर्चंट व फिरोज अब्दूल रशिद खान यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. रशिद खानला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील मुस्तफा डोसाचा 1993 ला मृत्यू झाला आहे. पोर्तूगाल देशाशी भारताचा प्रत्यार्पण करार झाला होता. त्यानुसार आबू सालेमला फाशी देता येणार नसल्यामुळे त्याला 25 वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगायला लागणार आहे. दाउद इब्राहिम याच्या दुबईतील व्हाइट हाउस या निवासस्थानी 1993 च्या बॉम्बस्फोटाचा कट रचला गेला. त्यावेळी अंनिस इब्राहिम, मुस्तफा डोसा आदि अनेक गँगचे म्होरके उपस्थित होते. या बैठकीत बाबरी मशिद पाडल्याचा सूड घेण्यासाठी मुंबईत मोठया प्रमाणात बॉम्बस्फोट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दाउद आतापयर्ंत तपास यंत्रणांना सापडलेला नाही कारण दाउदला पाकिस्तानसारखे भारतविरोधी देश संरक्षण देत आहेत. पाकिस्तानने 2008 साली मुंबईत अशांतता माजवण्यासाठी 26/11 चा हल्ला घडवून आणला होता. या प्रकरणातील हल्लेखोरांनी मुंबईतील 250 ते 300 नागरिकांना गोळया घालून ठार केले होते. या प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले. आपल्या देशातील अनेक राष्ट्रद्रोही पाकिस्तानच्या नादाला लागून देशात अशांतता माजवत आहेत. हा प्रकार काश्मिर खोरयातही दिसून येत आहे. भारताला राष्ट्रद्रोही नराधमांचा धोका आहे. भारतीय गुप्तचर खाते व केंद्र सरकारने देशातील विघातक शक्तींवर लक्ष ठेवले पाहिजे. देशातील कायद्याचा धाक अपप्रवृत्तींना वाटला पाहिजे, म्हणजे त्या शक्ती देशातील सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करायला धजावणार नाहीत. मुंबईत 1992 साली दंगल होउन हिंदू व मुस्लिम असे दोन तट पडले होते. देशात फुटीची बिजे रोवणारया धर्मवादयांवर कारवाई करणे गरजेचे आहे. भारतात धर्माच्या नावावर मोठे राजकारण चालते. कारण इथले लोक धर्माला प्रमाण समजून व्यवहार करतात. जग बदलत आहे, धर्मापेक्षा विज्ञाननिष्ठ वैचारिकतेवर भर देउन जेव्हा सर्वजण समाजातील सर्व व्यवहार करतील तेव्हा देशातील वातावरण अशांततेपासून मुक्त असेल. देशाला धर्माधर्मात विभागणारया अपप्रवृत्तींना लगाम घालण्याची गरज आहे.

– अशोक सुतार

साहित्यिक, व्यंगचित्रकार