मुंबई । मुंबई महापालिकेच्या विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी जाहीर केली. त्यामध्ये मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या अर्चना भालेराव यांना सार्वजनिक आरोग्य समितीची लॉटरी लागली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी ही भारतीय जनता पक्षाने सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने व आपले उमेदवार न दिल्याने शिवसेनेचे सहा ही नगरसेवकांना विशेष समिती अध्यक्षपदासाठी संधी मिळाली आहे.
सहापैकी चार ठिकाणी महिलांना संधी
मुंबई महापालिकेच्या चारही वैधानिक समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने बिनविरोध विजय संपादन केला. त्याचा धर्तीवर विशेष समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार बिनविरोध निवडून येतील अशी शक्यता आहे. शिवसेनेने आज विशेष समितीसाठी जाहीर केलेल्या नावांमध्ये सहापैकी चार ठिकाणी महिलांना संधी दिली आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य समितीसाठी डॉ. अर्चना भालेराव, महिला बालकल्याण समितीसाठी गीता गावकर, स्थापत्य समिती शहरसाठी अरुंधती दुधवडकर तर स्थापत्य समिती उपनगरे साधना माने या महिलांना संधी देण्यात आली आहे.