मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. त्यासाठी भाजपाने निवडणुकीच्या दृष्टीने दोन वर्ष आधीच तयारी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे. मनपा मधील विरोधी पक्षनेतेपदी प्रभाकर शिंदे आणि भाजपच्या महापालिका गटनेतेपदासाठी विनोद मिश्रा यांची नियुक्ती झाल्यानंतर आता माजी नगरसेवकाला मैदानात उतरवण्यात येत आहे. भाजपने नामनिर्देशित नगरसेवक गणेश खणकर यांचा राजीनामा घेतला आहे. त्यांच्या जागी पक्षाचे प्रभारी म्हणून नेमणूक झालेले माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना अधिकृत प्रवेश देण्यात येणार आहे.
महापालिका निवडणूक निकालानंतर मार्च महिन्यात पक्षाच्या कोट्यानुसार नामनिर्देशित सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली होती. भाजपचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बीएमसीमध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली होती. त्रिपाठींची कामगिरी पाहता त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता होती, परंतु उत्तर भारतीय व्होटबँकसाठी खणकरांचा बळी घेतल्याची चर्चा आहे.
मुंबई मनपा मध्ये शिवसेनेचे शिवसेना ९६, भाजपाचे ८२, कॉंग्रेसचे २९, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ८, समाजवादी पार्टी ६, एमआयएम २, मनसे १, तर अभासे १ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपाच्या या मुंबई मनपाच्या फेरबदलामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे.