मुंबई महानगरपालिकेच्या मध्य वैतरणा तलावाच्या सुरक्षेची एैशी कि तैशी!

0

मोखाडा । मोखाडा तालुक्यातील कोचाळा सरहद्दीत असलेल्या मध्य वैतरणा जलाशयात एका 30 ते 35 वर्षे वयोगटातील अनोळखी इसमाचे प्रेत तरंगतांना मिळून आले. मृत इसमाची ओळख पटलेली नाही. या ठिकाणी दुतर्फा सुरक्षा चौक्यांची मागणी सन 2012 पासून केली जात आहे. परंतु मुंबई महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही. मुंबई शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारा महत्वाकांक्षी प्रकल्प मोखाड्यातील कोचाळा येथे सन 2012 मध्ये साकार झालेला आहे. या प्रकल्पावर रहदारीसाठी आशिया खंडातील सर्वाधिक उंच, लांब, रुंद पुल उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा पुल आणि त्याखाली दुतर्फा पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे. परंतू पर्यटक पादचारी आणि वाहणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी कोणतीही उपाययोजणा करण्याची खबरदारी घेण्यात आलेली नाही.

मध्य वैतरणा पुलाच्या दुतर्फा सुरक्षा चौक्या उभारणे, सुचना फलक लावणे, रेडीयम लावणे, पथदिवे लावणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्वयंचलित कॅमेरे लावणे याबाबी अत्यंत आवश्यक आहेत. तथापी सन 2012 साली या प्रकल्पाचे काम पूर्ण होवून प्रकल्पावरील पूल रहदारीसाठी मोकळा होवूनही संबंधित विभागाकडून त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. मध्य वैतरणा प्रकल्प आणि लगतचा विस्तीर्ण दुर्लक्षित परिसर हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी मोकळे रान म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी प्रेतांची विल्हेवाट लावणे किंवा इतर अनुसूचित वापर करणे इत्यादी कामांसाठी या परिसराचा वापर केला गेला आहे. आता या जलाशयात तरंगत्या अवस्थेत अनोळखी प्रेत मिळून आल्याने या परिसराच्या आणि जलाशय प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.

तलावाचा परिसर संवेदनशील
एकट्या डॅम प्रकल्पावर 600 कोटी तर ट्रिटमेंट प्लॅन्ट व त्याशिवाय भांडूपपर्यंतचे एकूण 6 प्रोजेक्टवर सुमारे 1600 कोटी रुपयांचा खर्च केंद्र व राज्य सरकारने केलेला आहे. तर पुलाच्या बांधकामाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेकडून मिळालेली आहे. तसेच पुलाचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीतच पुर्ण झालेले आहे. मध्य वैतरणा परिसरात एका बाजूला दाट झाडी व खोल दरी आहे. भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेवून मागील काही वर्षात शहरी भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी प्रेतांची विल्हेवाट लावणे आदि गंभीर कामांसाठी परिसराचा वापर केलेला आहे. मध्य वैतरणेवरील पुलाची लांबी 150 मिटर असून पुलाची उंची 50 मीटर आहे. एकूणच मुंबई मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मासलेवाईक उत्तरे देवून हात वर केले असल्याने जीवांच्या आणि प्रत्यक्ष जलाशयाच्या सुरक्षेला कोणाला जबाबदार धरायचे येथे बाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.