मुंबई महापालिकेचा आता पवनचक्की, सौरऊर्जा प्रकल्प

0

मुंबई । मुंबई महापालिकेने तिच्या धरण क्षेत्रात विजेच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यानुसार तानसा धरणातील यशस्वी वीज प्रकल्पानंतर आता पवनचक्की आणि सौरऊर्जा सुरू करण्यात येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. सध्या महापालिकेला वीज खरेदी करतांना टाटा पॉवरकडून ती घ्यावी लागते. ज्याची किंमत वाढतच जात आहे, त्यामुळे महापालिकेने तानसा धरण क्षेत्रात स्वतःचा वीज प्रकल्प सुरू केला, तो यशस्वी झाल्यानंतर महापालिकेने पारंपारिक ऊर्जास्त्रोत अर्थात पवणचक्की आणि सौर ऊर्जा यांचा वापर करून ऊर्जा निर्मितीचा विचार सुरू केला आहे, ज्यामुळे महापालिकेला प्राप्त होणारी वीज तुलनेते खर्चिक नसणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात धरण प्रकल्पांच्या पाहणी दौर्‍यात पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी होणार्‍या पाणीपुरवठ्याची माहिती देण्यात आली. शिवाय पालिकेचे प्रस्तावित प्रकल्प, नव्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. तानसा धरणावर पालिकेने सुरू केलेल्या वीज प्रकल्पामुळे विजेसाठी होणार्‍या खर्चात 50 टक्के बचत होत असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी 49 लाखांचा खर्च आला आहे. विशेष म्हणजे वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याचा अपव्यय न करता पुनर्वापर करण्यात येतो.

वर्षभरासाठी वीज तयार करणार
या वीजनिर्मितीसाठी तलावाच्या पाण्याची पातळी (एफआरएल लेव्हल) 421 असणे आवश्यक असते. तानसा धरणातील सध्या उपलब्ध पाण्याचा साठा पाहता डिसेंबरपर्यंत ही वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या माध्यमातून 100 टक्के वीज ही स्वत: निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी वैतरणा धरणातून आवश्यक पाणीसाठा घेणार असल्याचे कार्यकारी अभियंता संदीप कोर यांनी सांगितले.