मुंबई महापालिकेची विजयी सलामी

0

मुंबई । शिव ओम्,स्वराज्य, संघर्ष, मुंबई पोलीस, महात्मा गांधी, शिवशक्ती, एम एच स्पोर्टस यांनी महिलां गटात, तर यजमान मुंबई महानगर पालिका, युनियन बँक, महाराष्ट्र पोलीस, महिंद्रा, माझगाव डॉक यांनी पुरुष गटामध्ये मुंबई उपनगर कबड्डी संघटना आयोजित मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. कुर्ला, नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू झालेल्या महिलांच्या ब गटात पुण्याच्या शिव ओम् संघाने मुंबई उपनगरच्या टागोर नगर संघाला 25-19 असे नमविले. मध्यांतराला 16-07अशी आघाडी घेणार्‍या पुणेकराना उत्तरार्धात थोडा प्रतिकार झाला. पुण्याकडून तृप्ती दुर्गे, स्नेहा साळुंखे, पायल वसवे तर टागोर नगरकडून नेहा सनगरे, सायली फाटक, नेहा फाटक यांचा खेळ उत्कृष्ट होता.

अ गटात मुंबई उपनगरच्या स्वराज्य संघाने रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्सचा 42-21असा सहज पराभव केला. स्मिता पांचाळ, अंजली रोकडे यांना या विजयाचे श्रेय जाते. कर्नाळाच्या रचना म्हात्रेला उत्तरार्धात सूर सापडला, पण संघाला विजयी करण्यास तो पुरेसा नव्हता. क गटात संघर्षने कोमल देवकर, कोमल यादव यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर रत्नागिरीच्या अनिकेत स्पोर्ट्सचा 38-28 असा पाडाव केला. पूर्वार्धातच दोन लोण देत विश्रांतीला 24-08अशी आघाडी घेणार्‍या संघर्षने नंतर मात्र सावध खेळ करीत हा विजय साकारला. अनिकेतच्या समरीन बुरोंडकर, सुप्रिया थोटे यांनी बरी लढत दिली. याच गटात पुण्याच्या एम एच स्पोर्टसने मुं. शहरच्या अमरहिंदचे कडवे आव्हान 25-21 असे मोडून काढले.मध्यांतराला 07-12 अशा 5गुणांनी पिछाडीवर पडलेल्या पुणेकरांनी उत्तरार्धात मात्र जोरदार प्रतिकार करीत विजय खेचून आणला. त्यातच अमरहिंदची तेजस्वीनी पोटे जायबंदी झाली. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरी जावे लागले. प्रतिक्षा कटके, आरती भिलारे, स्वप्नाली पासलकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अमरहिंदकडून तेजस्वीनी पोटे, जयश्री काटकर, प्रियांका पवार यांनी कडवी लढत दिली. पुरुषांच्या अ गटात युनियन बँकेने किंग्ज इलेव्हनचा 32-19 असा पाडाव करीत आगेकूच केली.