मुंबई महापालिकेच्या जकातीची भरपाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला आश्वासन

0

मुंबई – मुंबई महानगरपालिकेचे जकात रद्द झाल्यामुळे दरवर्षी मुंबई महानगरपालिकेला मिळणारे सुमारे सात हजार कोटी रूपयांचे उत्पन्न जीएसटीच्या माध्यमातून भरून दिले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाला दिले.

खासदार अनिल देसाई, राज्यमंत्री रविंद्र वायकर व आ. सुनील प्रभू यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता प्रकट केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पनात जकातीच्या सात हजार कोटींच्या उत्पन्नाचा भाग महत्त्वाचा आहे. जकातीचा ओघ शाश्वत असतो व रोजच्या रोज पालिकेच्या तिजोरीत तो पैसा जमा होत असतो. त्या निधीमधून रस्ते विकास, पाण्याच्या व्यवस्था, बेस्ट उपक्रमातील तोटा भरून देणे असे उपाय मुंबई महानगरपालिका करत असते. येत्या एक जुलैपासून वस्तू व सेवा करामुळे हा शाश्वत व हमखास स्त्रोत बंद होणार आहे. संसदेत याबाबतची दुरूस्ती केली जात असतानाही शिवसेना खासदारांनी याबद्दलची चिंता व्य्क्त केली होती. याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशी चर्चा केली होती. आता राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात जीएसटीला मान्यता मिळणार आहे. तेव्हा मुंबई मनपाच्या आर्थिक व्यवस्थेचा विचार करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्याची भेट घेतली, असे उद्योगमंत्री देसाई म्हणाले.