मुंबई । मुंबई महापालिकेतील 1388 कामगारांची भरती करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्यानंतर आता महापालिकेतील 247 दुय्यम अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे. स्थापत्य (सिव्हिल), यांत्रिकी (मेकॅनिकल) आणि विद्युत (इलेक्ट्रिकल) या पदांच्या रिक्त जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. बुधवारी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास येत्या दहा दिवसांमध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल.
याआधीची भरती सन 2015-16 मध्ये राबवली
यापूर्वी अभियंत्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सन 2013-14 आणि त्यांनतर 2015-16 मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार पुन्हा याच संस्थेवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी या संस्थेला प्रत्येक उमेदवारामागे 350 रुपये दिले जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेण्यात येणार आहे. उमेदवार जर मागासवर्गातील असेल तर 300 रुपये तर खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर 600 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार असल्याचे महापालिकेच्या नगरअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.