मुंबई महापौरपदी विश्‍वनाथ महाडेश्‍वर

0

मुंबई। मुंबई महापालिकेवर अखेर शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांची निवड झाली आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपची एकूण 171 मते पडली. महाडेश्‍वर यांनी काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांचा पराभव केला. लोकरे यांना अवघी 31 मते मिळाली. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली.

भाजपने कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता स्थापन होईल, हे निश्‍चित झाले होते. महापौरपदी शिवसेनेचे उमेदवार विश्‍वनाथ महाडेश्‍वर विराजमान होतील, हेदेखील निश्‍चित होते. मतदानावेळी भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना पाठिंबा दिला. शिवसेनेचे 84 आणि अपक्ष 4 आणि भाजपचे 82 आणि इतर 2 अशा एकूण 171 जणांनी विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या बाजूने मतदान केले, तर काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना 31 मते मिळाली. शिवसेनेच्या गटनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचीच सभागृहनेतेपदी निवड होईल, हे निश्‍चित झाले आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक गैरहजर राहिले. महापौर निवडणुकीत सहभागी होण्यापूर्वी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी हुतात्मा चौकात अभिवादन करून पारदर्शकतेची शपथ घेतली. भाजपच्या 82 आणि त्यांना पाठिंबा देणार्‍या नगरसेवकांनी महाडेश्‍वर यांनाच पाठिंबा दिला.