मुंबई मॅरेथॉनसाठी रुडीशा आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बॅसिडर

0

मुंबई : मुंबई मॅरेथॉनचा रोमांच हळूहळू शिगेला पोहोचत असून यासाठी जोरदार तयारी देखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक आणि जागतिक 800 मीटर चॅम्पियन व जागतिक विक्रम आपल्या नावे असलेला डेव्हिड रुडीशाला 15 जानेवारीला होणार्‍या ‘स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन 2017’ स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बॅसिडर म्हणून निवडण्यात आले आहे.28 वर्षीय केनियन मध्यम अंतराचा धावक असलेल्या डेव्हिडने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पार पडलेल्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये 1 :42.15 अशी वेळ नोंदवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते.

रुडीशा उत्साही
चार वर्षांपूर्वी लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 1:40.91 वेळेसह सुवर्णपदक मिळवले होते. रुडीशा हा 2010 ते 2012 असे सलग तीन वर्षे ‘आयएएएफ’ जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलीट राहिलेला आहे. 2012 साली तो एअरटेल दिल्ली अर्ध मॅरेथॉनचा इव्हेंट अ‍ॅम्बॅसिडर होता. भारताला पहिल्यांदा दिलेल्या भेटीच्या त्याच्या आठवणी अजूनही ताज्या असून पुन्हा भारतात येत असल्याने तो आणखीनच उत्साहित आहे.

स्पर्धकांना नक्‍कीच प्रेरणा मिळेल
मुंबई मॅरेथॉनसारख्या मोठ्या स्पर्धेचा भाग झाल्याने मी अत्यंत आनंदी आहे. दिल्ली अर्ध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मिळालेला आदर व टॅलेंट पाहता मुंबई भेटीकरिता मी अतिशय उत्सुक आहे, असे रुडीशा म्हणाला. भारतातील महत्त्वाच्या स्पर्धेचा भाग झाल्याने मी आनंदी आहे. भारतामध्ये सुरु असलेल्या या धावण्याच्या चळवळीला जगातून देखील तितकाच पाठिंबा मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. माझ्या या स्पर्धेतील सहभागामुळे स्पर्धकांना नक्‍कीच प्रेरणा मिळेल, असे रुडीशाने सांगितले.

रुडीशा अनेक धावपटूंचा आदर्श
या वर्षीच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी डेव्हिड रुडीशा भारतात येणार असल्याने आम्ही अत्यंत आनंदी आहोत. 800 मीटर धावण्याच्या प्रकारामध्ये जागतिक विक्रम आपल्या नावावर असलेला रुडीशा अनेक धावपटूंचा आदर्श आहे. त्याच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतील सहभागामुळे स्पर्धेतील सर्व धावपटूंना प्रेरणा मिळेल. रुडीशाचा अनुभव व धावण्यासाठीचा उत्साह यावर्षी स्पर्धेत धावणार्‍या प्रत्येक धावपटूला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करेल, असे ‘प्रोकॅम इंटरनॅशनल’चे सह व्यवस्थापकीय संचालक विवेक बी. सिंग यांनी सांगितले.