मुंबई । मेेट्रो 3 च्या भुयारी मार्गाच्या कामाने आता जोर धरला आहे. मेट्रो 3 अंतर्गत येणार्या सीएसएमटी ते मुंबई सेंट्रलदरम्यान रेल्वेकडून नुकतेच एका भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. याबाबतचा व्हिडिओ मुंबई मेट्रो 3 ने ट्वीट केला आहे तसेच टनेल बोरिंग मशीन्सच्या (टीबीएम्स) साहाय्याने या भुयाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या भुयाराची लांबी एकूण 860 मीटरइतकी आहे. याच प्रकल्पात आणखी एक बोगदा तयार करण्यात येणार आहे. भुयार सात हजार सहाशे चाळीस मीटर लांबीचे असणार आहेत. टीबीएमद्वारे मुंबई सेंट्रलपर्यंत या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या मशीन्सला महाराष्ट्रातील सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा या नद्यांची नावे देण्यात आली आहेत.
आझाद मैदान – या पॅकेज-2 मधील वैतरणा 1 आणि 2 टीबीएम्सद्वारे ग्रँट रोडपर्यंत 4.5 कि.मी. भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 450 मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
नयानगर – या पॅकेज-4 अंतर्गत कृष्णा 1 आणि 2 या टीबीएम्सद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत 2.5 कि.मी. भुयारीकरण करण्यात येणार असून, त्यापैकी 1005 मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
विद्यानगरी – या पॅकेज 5 अंतर्गत गोदावरी 1 आणि 2 या मशीन्सद्वारे आंतरदेशीय विमानतळ स्थानकापर्यंत 2.98 कि.मी. भुयारीकरण करण्यात येणार आहे. सध्या या पॅकेजअंतर्गत 342 मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
मरोळ नाका – या पॅकेज 7 अंतर्गत 2 टीबीएमद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचे 1.2 कि.मी. भुयारीकरण करण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये सध्या वैनगंगा 1 आणि 2 या मशीनद्वारे 395 मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे तसेच 15 टीबीएम्सचे कारखाना स्वीकृती परीक्षण पूर्ण झाले असून, प्रकल्पाला आवश्यक असणार्या सर्वच्या सर्व म्हणजे सतरा टीबीएम्स जुलैअखेर दाखल होती. त्यानंतर पॅकेजमध्ये भुयारीकरणाला प्रारंभ होणे अपेक्षित आहे. यामुळे कामाला अधिक गती मिळणार आहे.
विरोधक नरमले?
दरम्यान, मुंबई मेट्रो 3च्या प्रकल्पाला मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जात होता. ज्या ज्या उपनगरांतून या मेट्रोचा मार्ग निश्चित करण्यात आला होता, त्या त्या विभागांतील स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. पर्यावरणाला धोका आणि प्रदूषणाच्या त्रासाचे कारण देत नागरिक हा विरोध करत होते. मात्र, आता याच मेट्रो प्रकल्पाचे भुयारी मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करणारे विविध भागांतील विरोधक नरमले की काय? असा महत्त्वाचा प्रश्न आता विचारला जात आहे.