मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरला

0

मुंबई – मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून (एचआरडी) सोमवारी देशातील सर्वोत्तम उच्च शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये देशातील सर्वोत्तम 10 विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. मात्र मुंबई विद्यापीठ पहिल्या दहांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. अध्यापनाचा दर्जा , शैक्षणिक सुविधा, निकालाचे प्रमाण, शिक्षणाचा दृष्टीकोन, विद्यार्थ्यांशी संवाद व सर्वसमावेशकता आणि उत्पादक संशोधन या निकषांच्या आधारे नॅक समितीकडून या शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले होते. यामुळे सध्या तरी पुणेच शिक्षणाच्या बाबतीत दर्जेदार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या वतीने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेच्या एकत्रित यादीत बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने अव्वल स्थान पटकावले आहे तर मुंबईच्या आयआयटी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. विद्यापीठांच्या क्रमवारीतही बंगळुरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रथम क्रमांकावर आहे. वादग्रस्त कार्यक्रम आणि विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या अटकेमुळे वादात सापडलेले दिल्लीतील मजेएनयूफ केंद्रीय विद्यापिठांमध्ये द्वितीय स्थानी आहे. पुण्याच्या सावित्रीबी फुले विद्यापीठाने शिक्षणाचा आपला दर्जा राखत पहिल्या दहामध्ये दहावा क्रमांक पटकावला आहे. मुंबई विद्यापीठाला 132 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

मुंबई विद्यापीठाचा मान देशातील पहिल्या तीन विद्यापीठांत असून क्रमवारीत मात्र पहिल्या 100 मध्येही नाही ही खरी शोकांतिका आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने याची जबाबदारी स्वीकारून यासाठी आवश्यक ती चाचपणी सुरु करयला हवी. देशभरातील विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत असल्याने नक्कीच येथील दर्जाबाबत काळजी कुलगुरूनी आणि प्रशासनाने घ्यायला हवी.
संतोष गांगुर्डे, उपाध्यक्ष, मनविसे.

नॅक आणि एमडीएकडून मूल्यांकन केले जाते होते मात्र मोदी सरकारने संस्थांची रँकिंग करण्याचा निर्णय घेतला असून गुणवत्ता असलेल्या संस्था लोकांना कळाव्या, हा यामागचा उद्देश आहे. चांगल्या गुणवत्तेच्या संस्थांना जास्त मदत केली जाईल.
प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री