मुंबई । राज्यपाल तथा मुंबई विद्यापीठाचे कुलपतीचे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ झाला. यावेळी विविध विद्याशाखांतील 1,61,173 स्नातकांना पदवी प्रदान करुन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरु डॉ.संजय देशमुख व रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.मुकेश अंबानी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरु डॉ.संजय देशमुख म्हणाले, डिजीटल विद्यापीठ, स्कील डेव्हलपमेंट अशा नव्या कार्यक्रमांमुळे मुंबई विद्यापीठ आज अग्रस्थानी आहे. मुंबई विद्यापीठाने सर्व महाविद्यालये, मुंबई विद्यापीठाची सर्व संकुले एकमेकांशी जोडल्याने याचा फायदा जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. मुंबई विद्यापीठ हे देशातील व्यापक विद्यापीठ असल्याचे दिसून येते. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत आणि डिजीटल इंडियाकडे पाऊल टाकत 100 टक्के डिजीटल होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका, स्नातक प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने आणि एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
मुलांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कटीबद्ध
राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान अंतर्गत विद्यानगरी आणि ठाणे येथील विद्यापीठ संकुलात 40 व्हर्च्युअल क्लासरुम तयार करण्यात आले असून सदर क्लासरुम महाविद्यालयाच्या संपर्कात असतील. स्कील इंडियाचे मिशन पूर्ण करताना मुंबई विद्यापीठाने गरवारे इन्स्टिट्यूट येथे अनेक स्कील बेस्ड अभ्यासक्रम सुरु केले आहेत 2016-17 या एकाच वर्षात मुंबई विद्यापीठाने सर्व शैक्षणिक पदव्यांशी संबंधित अभ्यासक्रमांमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. कुलगुरु डॉ.देशमुख म्हणाले.
स्नातकांना पदवी प्रदान
या दीक्षांत सभारंभामध्ये राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण 1,61,173 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 73,795 विद्यार्थी आणि 87,378 विद्यार्थिंनींचा समावेश आहे. कला विद्याशाखेतील 130, ललितकला विद्याशाखा 2, वाणिज्य विद्याशाखा 21, विधी विद्याशाखा 2, तंत्रज्ञान विद्याशाखा 22 आणि विज्ञान तंत्रशाखा 145 अशा 326 स्नातकांना विविध विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी आणि एमफिल पदवी प्रदान करण्यात आल्या.
मुकेश अंबानी यांची उपस्थिती
आज भारतीयांमध्ये असलेली बुद्धिमत्तेमुळे ते जगाशी स्पर्धा करु शकतात. जगाच्या वास्तविकतेशी सामना करताना, जीवनाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना त्यांची निरीक्षण शक्ती, प्रयोगबुद्धी, मूल्यमापन आणि भविष्याची आखणी करणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी सचोटी, आत्मविश्वास आणि संयमीपणा असेल तर यश मिळतेच हे लक्षात ठेवा. पण असे करीत असताना केवळ एक यशस्वी व्यक्ति होण्याचे नियोजन न करता एक चांगला व्यक्ती बनण्याचेही नियोजन करा, असा सल्लाही डॉ.अंबानी यांनी आपल्या भाषणातून उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.