मुंबई – मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल पाच ऑगस्टपर्यंत जाहीर होतील आणि सर्व विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टपर्यंत गुणपत्रिका मिळतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.
१५ ऑगस्टपर्यंत गुणपत्रिका मिळणार असल्यामुळे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. आवश्यकता भासल्यास परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली जाईल असे फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेसचे संजय दत्त आणि शिवसेनेचे अनिल परब यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला होता.
पेपरतपासणीसाठी ऑनलाइन यंत्रणा चांगली आहे. या यंत्रणेत अडचणी निर्माण झाल्यामुळे हे मूल्यांकन निर्धारित वेळेत होऊ शकले नाही. मात्र, या अडचणी तत्काळ दूर करण्यात आल्या. यात जाणीवपूर्वक कोणी काही केले असेल तर तपासून पाहिले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पिकविम्याचे ऑफलाईन अर्ज स्वीकारणार
पिकविम्याचे अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील पिकविम्याचे अर्ज भरण्यासाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आताही केवळ ‘ऑनलाईन’ अर्जच स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मुदतवाढीचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज ‘ऑफलाईन’देखील स्वीकारावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती.