मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल आता थेट 15 ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तशी माहीतीच कुलगुरू संजय देशमुख यांनी युवासेनेच्या पदाधिकार्यांना दिलीय. मुंबई विद्यापीठावर मंगळवारी युवासेनेने धडक मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू संजय देशमुख आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी कुलगुरू संजय देशमुख यांनीही निकालाच्या दिरंगाईसंबंधीची हतबलता बोलून दाखवल्याचा दावा युवा सेनेच्यावतीने करण्यात आला. दरम्यान, सोमवारी कुलसचिव एम. ए. पठाण यांनी कसल्याही परिस्थितीत 5 ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे निकाल लागतील असा दावा केला होता. अशातच स्वतः कुलगुरूंनीच आंदोलक विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागणार नसल्याचं सांगितल्याने विद्यार्थ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागलाय. म्हणूनच मुंबई विद्यापीठाने निकालाची निश्चित तारीख जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
45 दिवस उलटून रखडलेलत निकाल
1उशिरा सुरू करण्यात आलेली ऑनलाइन मूल्यांकनची प्रक्रिया आणि या पद्धतीतील तांत्रिक घोळ यामुळे 373 पदवी परीक्षांचे निकाल 45 दिवस उलटून गेले तरी रखडलेले होते. याबाबत विद्यार्थी संघटना, बुक्टू आणि अनेक संघटनानी वेळोवेळी विद्यापीठाला जाब विचारूनही विद्यापीठाने याकडे कानाडोळा केला.
3 लाख उत्तरपत्रिका केव्हा तपासणार
मुंबई विद्यापीठाचे जवळपास 2 लाख 93 हजार उत्तर पत्रिकेचे मुल्यांकन करून त्वरित जाहीर करावेत अशी मागणी संघटना करीत आहे. विद्यापीठाच्या वाणिज्य, विधी, कला व अभियांत्रिकी शाखांचे निकाल लागण्यास आणखी काही दिवस लागतील याचा प्रचंड मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आतापर्यंत 477 पैकी 171 निकालच विद्यापीठ प्रशासन जाहीर करू शकले आहेत. उत्तरपत्रिकेच्या ऑनलाईन मुल्यांकनाच्या अट्टहासामुळे निकाल न जाहीर झाल्याने पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाचे प्रवेशद्वार व भविष्य धोक्यात आलेले आहे, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.