मुंबई । मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी किर्ती कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी डॉ. मगरेंच्या नियुक्तीचे आदेश कुलपतींनी दिले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय देशमुखांच्या हकालपट्टीनंतर कुलपतींनी ही नियुक्ती केली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी धीरेन पटेल यांची ऑगस्टमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. धीरेन पटेल हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान महाविद्यालय म्हणजेच व्हीजेटीआयचे संचालक आहेत. व्हीजेटीआयची धुरा सांभाळताना त्यांना मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळावी लागत होती.
अडीच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरूपद रिक्त असल्यामुळे प्रशासनावर जोरदार टीका होत होती. मगरे यांना याआधी विद्यापीठाच्या प्रभारी रजिस्ट्रारपदासाठी विचारणा केली होती. मात्र त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे त्यांच्या जागी दिनेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल डेडलाईन देऊनही वेळेवर न लावल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हकालपट्टी केली होती. त्यामुळे कुलगुरू पद रिक्त आहे. कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपालांनी डॉ. कस्तुरीराजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.