मुंबई । मुंबई विद्यापिठाला निकाल घोषित करण्यासाठी दिलेल्या तीनही मुदतीचे विद्यापिठाने अक्षरशः बारा वाजवले, त्याचे परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर झाले आहेत. दिलेल्या वेळेत परीक्षांचे निकाल लावण्यात मुंबई विद्यापीठ सातत्याने अपयशी ठरत आहे. विद्यापिठाच्या या हलगर्जीपणामुळे 4 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे विद्यापिठाच्या विरुद्ध संतप्त विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केेले असून मुंबई युवक काँग्रेस व मुंबई एनएसयूआयतर्फे मंगळवारी, 22 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये सर्व कॉलेजच्या बाहेर हस्ताक्षर अभियान राबवण्यात आले.
काँग्रेसने मुंबई विद्यापीठावर मोर्चा आणल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी 15 ऑगस्ट 2017 ही तारीख अंतिम तारीख म्हणून दिली होती. पण तिसरी डेडलाईन निघून गेली. तरीही विद्यार्थ्यांचे निकाल अजून रखडलेलेच आहेत. ज्यामुळे 4 लाख विद्यार्थ्यांचे करिअर आणि जीवन दोन्हीही धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचा संताप आणि उद्वेग सह्यांच्या माध्यमातून व्यक्त करता यावा आणि याची जाणीव मुंबई विद्यापीठ आणि प्रशासनाला व्हावी, यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे हे हस्ताक्षर अभियान राबवण्यात आले. तसेच येत्या काळात जर शिक्षण मंत्री विनोद तावडे व कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी राजीनामा दिला नाही, तर मुंबई युवक काँग्रेस व मुंबई एनएसयुआयने राज्यपाल यांच्या राजभवनावर घेराव आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.