मुंबई विद्यापीठात गोंधळात

0

गोंधळऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे गोत्यात आलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख विद्यापीठातील परिक्षांचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठवले असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई विद्यापीठाचा कारभार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर सोपवला आहे तर व्हीजेटीआय (जिजामाता तंत्रज्ञान संस्था) चे संचालक धीरेन पटेल यांची मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. देशमुख यांनी एकाच वेळी ऑनस्क्रीन मूल्यांकनाचा निर्णय जाहीर केल्यानंतर प्राध्यापक व काही शिक्षणतज्ञांनी टिका केली होती; मात्र देशमुख आपल्या मतावर ठाम राहिले आणि त्यांनी निकाल वेळेत लावण्याचे आव्हान स्विकारले. सर्व प्रक्रिया उशिरा सुरू करून अल्पावधीत प्रशिक्षणाचा घाट घालून देशमुख यांनी प्राध्यापक व परीक्षा विभागावर सक्ती केली. परिणामी विद्यापीठाने घेतलेल्या अनेक परीक्षांचे निकाल अजूनही लागलेले नाहीत. विद्यार्थी संघटनांच्या मागणीमुळे राज्यपालांनी विद्यापीठाला 31 जुलैपर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले. यानंतर देशमुख यांनी महाविद्यालयांना चार दिवस सुट्टी देउढन प्राध्यापकांना पूर्णवेळ उत्तरपत्रिकेची तपासणी करण्यासाठी दबाव टाकला. कुलगुरूंनी घाईघाईने घेतलेल्या निर्णयाचा प्राध्यापकांच्या कामकाजावर परिणाम होऊन काही तांत्रिक चुका झाल्या आणि 5 ऑगस्टपर्यंत 15 टक्के विद्यार्थ्यांचा निकाल लावला गेला. 15 ऑगस्टपर्यंत निकालासाठी डेडलाइन दिली तरी अजुनही मुंबई विद्यापीठाला पूर्ण निकाल लावता आलेला नाही. 17 ऑगस्टपर्यंत 128 निकाल शिल्लक आहेत. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या निकालाप्रश्नी आता थेट प्रधानमंत्र्यांनी लक्ष घालावे व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मुंबई विद्यापीठातील परिक्षांच्या अगोदर घाईघाईने ऑनस्क्रीन मुल्यांकनाचा निर्णय घेऊन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केलेली चूक आता प्राध्यापक दुरूस्त करीत आहेत. कारण प्राध्यापकांना आता निकाल लागल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही, असे दिसत आहे. कुलगुरू जर मन मानेल तसे निर्णय घेऊ लागले तर त्यांना जाब विचारणारी प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी आवश्यक वाटू लागली आहे. या घाईघाईमुळे मुंबई विद्यापीठातील एक हुशार विद्यार्थी , त्यालाही  सदोष उत्तरपत्रिका मुल्यांकनाचा  फटका बसला आहे; कारण या विद्यार्थ्याला शेवटच्या वर्षात विद्यापीठ प्रशासनाने घाईघाईने निकाल लावताना चक्क नापास केले आहे. यामुळे अनेक हुशार, पण विद्यापीठाने चुकीच्या पद्धतीने नापास केलेल्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरी सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. कुलगुरूंनी आपल्या हट्टापायी सर्वांना वेठीस धरणे, म्हणजे एकप्रकारचा गंभीर गुन्हा आहे. मुंबई विद्यापीठातील ऑनस्क्रीन मुल्यांकनाच्या सदोष पद्धतीमुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना 10-20 पर्यंत गुण मिळाले आहेत. काही ठिकाणी पुरवणीचे गुण पूर्ण गुण म्हणून देण्यात आल्याचा पराक्रम विद्यापीठाने केला आहे. आम्ही निकाल वेळेतच लावणार अशा फुशारक्या मारणारे देशमुख आता सक्तीच्या रजेवर आहेत म्हणे !  कारण मुंबई विद्यापीठामध्ये लवकर निकाल लागत नाही, असे अनेक वेळा दिसून येते. परंतु यावर्षी हे प्रमाण अधिक झाल्याचे दिसून आले. कुलगुरू रजेवर आहेत. त्यांच्या जागी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे विद्यापीठाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांनी व प्र कुलगुरू धीरेन पटेल  यांनी सदोष निकालांची फेरतपासणी व पुन्हा निकाल तसेच अर्धवट (पुरवणी पाहून) दिलेला सदोष निकाल सुधारत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. एका व्यक्तीमुळे किती जण गोत्यात येतात, हे या मुंबई विद्यापीठाच्या निकाल रामायणामुळे स्पष्ट होते.  477 पैकी 349 निकाल लागले असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पद हे शोभेचे नसून जबाबदारीचे पद आहे, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे. कोणतीही संस्था, आस्थापना किंवा समुह असेल तर त्यात टिमवर्कचे मोठे महत्व असते. लोकशाही पद्धतीने काम केले तर त्याचे परिणाम व निकालही योग्य लागतात. मुंबई विद्यापीठातील सावळागोंधळ या निमित्ताने सर्वांना पहायला मिळाला. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दोषी धरून राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. ऑनस्क्रीन असाईनमेंटचे कंत्राट दिलेली मेरिट रँक ही कंपनी कोणाची आहे? त्याचे संचालक कोण आहेत? त्यांना कंत्राट मिळाले कसे? याची माहिती उजेडात आली पाहिजे.

मुंबई विद्यापीठातील निकालास विलंब लागल्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी कुलगुरूंचा निषेध केला होता. याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आंदोलन केले होते. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे याप्रश्नी प्रधानमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या वर्षी विद्यार्थ्यांना निकालाच्या विलंबामुळे व सदोष निकालपद्धतीमुळे मानसिक त्रास झाला आहे. परंतु, यापुढे तो होता कामा नये; राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा प्रश्न केंद्र सरकारकडे मांडून विद्यापीठ प्रशासनाला कडक शिस्त लावण्याची गरज आहे.  कुलगुरू म्हणजे कुणी राजा नाही, तो लोकशाही प्रक्रियेतील लोकशाहीच्या मुल्यांनुसार कारभार करणारा कुशल प्रशासक हवा. मुंबई विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाची भरपाई  कदापि करता येणार नाही; परंतु, मुंबई विद्यापीठातील प्रशासनात योग्य ते बदल करून कार्यतत्पर, कुशल प्रशासक नेमण्याची गरज वाटते.

अशोक सुतार- 8600316798