मुंबई विद्यापीठ अपयशीच, निकाल लांबणीवरच!

0

मुंबई : 5 दिवस हातात असतांना मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी 31 जुलैपर्यंत सर्व शाखांचे निकाल लावू, असे छातीठोकपणे विधीमंडळाला तसेच समस्त विद्यार्थी वर्गाला सांगितले होते. दिवसाला एक लाखाहून अधिक उत्तरपत्रिका तपासण्याचे आव्हान एक प्रकारे कुलगुरुंनी त्यांचे पद वाचवण्यासाठी घेतले होते, प्रत्यक्षात मात्र त्यांना हे आव्हान पेलता आले नाही. उद्या, सोमवारी ही मुदत संपणार असून अद्याप तीन लाख उत्तरपत्रिका तपासण्याच्या बाकी आहेत. त्यामुळे विद्यापिठाचा निकाल लांबणीवर पडणार हे आता निश्चित झाले आहे. या प्रकरणी कुलगुरूंना राजीनामाही तयार ठेवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत कुलगुरुंनी विद्यापीठ प्रशासनाशी संबंधित विविध विभागांच्या बैठका रविवारी बोलावल्या, मात्र त्यातही कुणी उपस्थित राहिले नाही, कोरममुळे या बैठकाही रद्द कराव्या लागल्या आहेत. अशा प्रकारे कुलगुरु डॉ. देशमुख आता ऐकाकी पडले असून उद्याच्या दिवशी शिक्षणमंत्री विनोद तावडेही आता यातून अंग काढून घेतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द
उद्या निकाल जाहीर करण्याची अंतिम मुदत आहे, परिस्थिती अद्याप हाताबाहेर असून ती आता अवाक्यात येणार नाही, अशी आहे. त्यामुळे एकंदरित परिस्थितीवर विचारमंथन करण्यासाठी कुलगुरु डॉ. देशमुख यांनी रविवारी सुटीचा दिवस असूनही 4 बैठका बोलावल्या. यात अॅमकॅडेमिक कौन्सिल, मॅनेजमेंट कौन्सिल, प्रॉस्पेक्टिव्ह प्लान आणि सिनेट अशा चार बैठका बोलावण्यात आल्या होत्या. त्यापैकी मॅनेजमेंट कौन्सिल, सिनेट आणि अॅटकॅडेमिक कौन्सिल या तीन बैठकांसाठी संबंधित सदस्य विद्यापिठात फिरकलेच नाहीत, त्यामुळे या बैठका रद्द कराव्या लागल्या, त्यामुळे कुलगुरु आज अक्षरशः एकाकी पडले आहेत.

शिवसेना शिक्षणमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणणार
दरम्यान काल शनिवारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापिठाच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. तावडे यांनीही कुलगुरुंच्या दाव्यावर विश्वास ठेवून सभागृहात कुलगुरुंची भाषा बोलली, त्यामुळे आता तावडेही अडचणीत सापडले आहेत. उद्या सोमवारी, शिवसेना तावडेंच्या विरुद्ध मैदानात उतरणार आहे. उद्यापर्यंत निकाल न लागल्यास तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू, असा इशारा शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
परीक्षा झाल्यानंतर पुढच्या 45 दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक असतांना विद्यापिठाने 427 परीक्षांचे निकाल प्रलंबित ठेवले आहेत. ऑनलाइन पेपर तपासणीचा प्रयोग कोणत्याही पूर्व तयारीशिवाय सुरु केल्यामुळे विद्यापिठाला या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. विद्यापिठाच्या या चुकीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर अभ्याससक्रमासाठी परदेशात प्रवेश घ्यायचा असतो, मात्र त्यासाठी विद्यार्थी रखणार आहेत. याचा फटका मात्र कुलगुरुंना बसणार आहे.