मुंबई विभागातून नेमबाजीत रुचिरा अरुण लावंड हिला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर!

0

मुंबई । सन 2016-17चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या 13 व्या वर्षांपासून या खेळात आहे. आजतागायत रुचिराने अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले नैपुण्य दाखवले आहे. वयाच्या 15 व्या वर्षी तिने डेहराडून येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत एअर रायफल या प्रकारात नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. सध्या ती एअर रायफल याबरोबरच पॉइंट 22 या नेमबाजीच्या दोन्ही प्रकारात खेळते. रुचिराचे मूळ गाव सातार्‍याजवळील खातगुण हे असून मुंबईत तिचे शिक्षण झाले.

शालेय शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात झाले. रुईया महाविद्यालयातून 12 वी झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ अभ्यासक्रमाद्वारे पदवीचे शिक्षण घेतले. रायफल शूटिंग बरोबरच रुचिरा ही जिम्नॅस्टिक्सची माजी राष्ट्रीय खेळाडू आहे.