मुंबई विमानतळाने स्वतःचा विश्‍वविक्रम काढला मोडीत

0

मुंबई । मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने एकाच दिवसात एकाच धावपट्टीवरून तब्बल 980 विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग करून आपलाच विक्रम मोडलाय, अशी माहिती विमानतळ अधिकार्‍यांनी दिली. 20 जानेवारीला हा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला आहे. या सगळ्या विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग सुखरूप आणि वेळेत झाल्याने या विक्रमाची यशस्वी नोंद झाली आहे.

मुख्य धावपट्टी दुरुस्तीसाठी बंद आहे
यावेळी सरासरी दीड मिनिटाला एका विमानाने टेक ऑफ आणि लँडिंग केले होते. एकच धावपट्टी असलेला ब्रिटनमधला गॅट्विक विमानतळ हा जगातला दुसरा व्यस्त विमानतळ आहे. मात्र, या विमानतळालाही ही कामगिरी शक्य झाली नाही ती आपल्या मुंबई विमानतळाने यशस्वीरीत्या करून दाखवली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी दुरुस्तीच्या कामासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असे सात तास ही धावपट्टी बंद असेल. त्यामुळे मुंबई विमातळावर ये-जा करणारी विमाने पर्यायी धावपट्टीवर वळवण्यात येतील.

मुंबई विमानतळाचा विश्‍वविक्रम
20 जानेवारी – 24 तासांत 980 टेक-ऑफ आणि लँडिंग, एकच रनवे असणार्‍या विमानतळांमध्ये मुंबईचा क्रमांक पहिला, मुंबईत रनवे 2, पण एका वेळी एकच रनवे वापरता येतो, 6 डिसेंबर 2017 – 974 टेक-ऑफ आणि लँडिंग, 24 नोव्हेंबर 2017 – 969 टेक-ऑफ आणि लँडिंग, दररोज सरासरी 930 टेक-ऑफ आणि लँडिंग, वर्षाला 4.52 कोटी प्रवासी.