ह्युस्टनची दूरदर्शी, संवेदनशील आपत्कालीन व्यवस्था
चक्रीवादळाच्या थैमानात ह्युस्टनमध्ये घरोघरी सरकारप्रणीत स्वयंसेवक पोहोचले. मुंबईतील अतिवृष्टीने नक्की किती हानी झाली याची टेक्सासप्रमाणे आकडेवारीही उपलब्ध नाही. इस्त्रायलच्या एका तज्ज्ञाला तेव्हा 2001 मध्येच आपत्काळात महापालिकेचा व राज्य सरकारच्या पोलिसादी खात्यांचा संघटनात्मक अहंकार जाणवला. 29 ऑगस्ट 2017 च्या अतिवृष्टीत लष्कर, नौदल, वायुदलाची मदत मागणे तर दूरच राहिले. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात मुंबई, कोलकात्याला दिलेला धोक्याचा इशारा किती नेत्या-बाबूंनी अभ्यासला. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या प्रेरणेसाठी तरी ह्युस्टन महापालिकेकडे पाहा.
मंगळवारी 29 ऑगस्टला मुंबई परिसरात प्रलंयकारी पाऊस कोसळला. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या बारा तासांमध्ये सांताक्रूझ येथे 315.8 मि.मी. तर कुलाबा येथे 101.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचे आतापर्यंतचे प्रमाण लक्षात घेता 26 जुलै 2005 नंतरचा हा सर्वाधिक पाऊस ठरला. त्याच वेळी अमेरिकेच्या इतिहासातील महाभयंकर हार्वे चक्रीवादळ टेक्सास प्रांतातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या ह्युस्टनमध्ये थैमान घालत होते. सव्वा कोटी नागरिकांना त्याची झळ पोहोचली. हजारो बेघर झाले. मुसळधार पाऊस, महापूर आणि चक्रीवादळामुळे पाच दिवसांत सुमारे 38 जण मृत्युमुखी पडले, 18 हजार कोटी डॉलर्सचे नुकसान झाले. कतरीनानंतर सर्वात महागडी ठरलेली टेक्सासमधील हार्वे चक्रीवादळाची ही घटना आहे. ऑइल कंपन्या, रासायनिक संयंत्रे, बंदरे, रस्ते, घरे, वाहने यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बचावकार्य सुरू असतानाच, चक्रीवादळाचा दुसरा तडाखा बसला, पण ह्युस्टन आणि एकंदरच टेक्सास प्रांत कोसळला. कोलमडला नाही कारण होते सक्षम, आत्मविश्वासपूर्ण, दूरदर्शी आणि संवेदनशील आपत्कालीन व्यवस्था.
ह्युस्टन प्रशासनाने काय केले…
मुंबईपासून हजारो किलोमीटर दूर असलेले अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुंबईसारखीच किंबहुना अधिक तीव्र परिस्थिती निर्माण झाली होती. सलग आठ तासांच्या पावसाने भारताची आर्थिक राजधानी मानली जाणारी मुंबई पायाभूत सुविधांनी कोलमडून ठप्प केली होती. टेक्सास प्रांतातील ह्युस्टन शहरात 38 लोक बळी गेले आणि हजारो बेघर झाले आणि त्यांना छावणीत आश्रय घ्यावा लागला. हार्वे चक्रीवादळाने दक्षिण टेक्सासमध्ये आणि लुसियानात जबरदस्त नुकसान केले. अमेरिकेचे तटरक्षक दल, राष्ट्रीय संरक्षण दलाने ताबडतोब पाच राज्यांमधून मदत आणि लोकांची सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला. मुंबई आणि टेक्सासची तुलना होऊ शकत नाही. परंतु, दोन देशांमधील प्रशासनाचा अशा घटनांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची नक्कीच तुलना केली पाहिजे.
टेक्सासच्या गव्हर्नरने संपूर्ण टेक्सास संरक्षण दलाच्या 12 हजार तुकड्या वादळाने बाधित झालेल्या माणसांना मदत करण्यासाठी रस्त्यावर आणल्या. 30 हजार राष्ट्रीय दलाचे जवान परिसरात हजर झाले आणि स्थानिक पोलीसही त्यांना मदतनीस म्हणून देण्यात आले. मागील कतरिना नावाच्या प्रलयंकारी चक्रीवादळाच्या वेळी आलेल्या भयंकर अनुभवापासून प्रशासनाने धडे घेतले. पुरात सापडलेल्या लोकांना सोडवण्यासाठी हेलिकॉप्टर आणण्यात आली. पाणी साठलेल्या ठिकाणी ताबडतोब बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या. वादळाची पूर्वसूचना मिळताच प्रशासनाशी समन्वय असलेले स्वयंसेवक घराघरांत पोहोचले आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे सुरू झाले. लोकांसाठी सर्व सुविधांनी सज्ज अशी तीन आश्रयस्थाने टेक्सास प्रांतात तयार होती. मंगळवारी परिस्थिती सुधारली लोक घरांकडे परतू लागले तेव्हाही आपत्कालीन व्यवस्थेची जबाबदारी संपली नव्हती. ह्युस्टनच्या महापौरांनी पोलिसांकरवी रात्रीची संचारबंदी लागू केली. त्यामुळे लुटालुटीवर नियंत्रण मिळाले. तेथील पालिका प्रशासनाने अजून कितीही पाऊस पडला, तरी आम्ही जनतेला त्रास होणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे. आम्ही तयार आहोत, असे जाहीर केले आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणातील बदलांमुळे शहरे पाण्याखाली जात आहेत, दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे या दीर्घसूचनेचे राज्यकर्त्यां वर्गाला आकलन झाल्यामुळे अमेरिकेत तयारी होती.
मुंबईत लुटारूंचे फावले…
मुंबईत सतत आठ तास पाऊस पडत होता. जुलै 2005 मध्येही अशीच स्थिती होती. त्या घटनेपासून अनुभव घेऊन पालिका प्रशासनाने काहीच तयारी केली नाही हे निर्माण झालेल्या अव्यवस्थेच्या वातावरणावरून लक्षात आले. भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टी आणि समुद्रात उंच लाटांचे उधाण येईल अशी सूचना दिली होती. असे असूनही त्या दिवशी शाळाही लवकर सोडल्या नाही किंवा सुट्टीही जाहीर करण्यात आली नाही. अतिरिक्त बस तैनात करण्यात आल्या नाहीत की खासगी वाहतूकदारांशी चर्चा करण्यात आली नाही. रस्त्यावर अडकून पडलेल्या चाकरमान्यांना आणि अन्य लोकांना आश्रयस्थाने उपलब्ध करून दिली ती दयाळू व्यक्तींनी आणि स्वयंसेवी संस्थांनी. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनीच एकमेकांना मदत केली. कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, घरापासून दूर बेसहारा अडकून पडलेले चाकरमानी यांची कुटुंबापर्यंत पोहोचण्याची धडपड असा हा प्रयत्न होता. त्याच वेळी टॅक्सी आणि रिक्षावाले लुटारू झाले. त्यांना कित्येक वर्षे मुंबईमधील अतिवृष्टी धंद्याची संधी वाटते. आपत्कालपश्चातही दूध, भाज्या, ब्रेडचा पुरवठाही पालिका प्रशासनाला सुरळीत करता आला नाही.
मुंबई, कोलकात्याबद्दल 1203 वैज्ञानिक सांगतात….
आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात जगात घडणार्या नैसर्गिक आपत्तीपैकी 91 टक्के घटना घडतात, असा संयुक्त राष्ट्रांतील तज्ज्ञांचा अहवाल सांगतो. मागील शतकातील घटनांचा आढावा घेऊन निष्कर्ष काढला आहे. सन 2070 पर्यंत कोलकाता, मुंबई, बँकॉक, ढाका, गोन्झाउ आणि शांघाय ही शहरे किनारपट्टीत येणार्या पुरांच्या धोक्यात निरंतर येणार आहेत. कोट्यवधी लोकांचे स्थलांतर या शहरांमधून करावे लागणार आहे. ग्लोबल एन्व्हायरोनमेंट आऊटलूक रिजनल असेसमेंट या संयुक्त राष्ट्र पर्यावरण अभियानांतर्गत अहवालात ही धोक्याची सूचना दिलेली आहे. एक हजार 203 वैज्ञानिकांनी हा अहवाल तयार केला आणि 160 देशांचा सहभाग या प्रकल्पात होता. 1981 ते 2010 या कालावधीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस होण्याचे प्रमाण 56 टक्क्यांनी वाढले आहे. अहवालात संबंधित देशांच्या सरकारांना आतापासून तयारी करा, असे आवाहनही करण्यात आले आहे. लोकसंख्यावाढ, बेसुमार नागरीकरण, जमिनींचे नापिकीकरण, हवामान बदल, वाळवंटीकरण आणि दुष्काळ अशा कारणांनी लोक स्थलांतर करीतच आहेत.
इस्त्रायलच्या तज्ज्ञांनी तेव्हाच यांना ओळखले…
सप्टेंबर 2001मध्ये राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि इस्त्रायल सरकार यांच्या सहकार्यातून आपत्कालीन परिस्थितीवर एक कार्यशाळा झाली होती. वादळ, पाऊस, भूकंप अगदी मानवनिर्मित आपत्कालात लोक घाबरतात ही अंधश्रद्धा आहे उलट लोक अधिक सावध होऊन कृती करतात, असा दावा डेव्हिड गिर्डन या इस्त्रायलच्या तज्ज्ञाने केला होता. मुंबईच्या अतिवृष्टीने हे दाखवून दिले. आपत्कालात मुंबईकर घाबरला नाही, तर त्याने स्वतःचे रक्षण स्वतःच केले. सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतःच्या सुरक्षेची काळजी मुंबईकरांनी घेतली. सरकारने नगण्य भूमिका बजावली. गिओरा राणा नावाचा आपत्काल हाताळण्यात माहीर असलेल्या इस्त्रायलच्या एका तज्ज्ञाला तेव्हा 2001 मध्येच महापालिकेचा आणि राज्य सरकारच्या पोलिसादी खात्यांचा संघटनात्मक अहंकार जाणवला होता. आजही 29 ऑगस्टच्या अतिवृष्टीत महापालिका, पोलीस, राज्य सरकार प्रयत्न करत असतील, पण ते पृथक प्रयत्न दुर्बल ठरले इतके की ते कुणाला दिसून आले नाहीत. आरोग्य, पोलीस, अग्निशमन, वाहतूक, वीज, पाणी आदी खात्यांमधील समन्वय दिसून आलाच नाही.
बाबू-नेत्यांचे आपत्कालाचे आकलन सुमार…
लोकशाही व्यवस्थेत आपत्कालीन परिस्थिती अधिक चांगली हाताळता येते, असे म्हटले जाते. तेव्हा लोकांची मागणी, प्रसार माध्यमांनी दाखवून दिलेल्या समस्या यांची नोंद घेऊन त्याला प्रतिक्रिया म्हणून संस्थात्मक बचाव यंत्रणा तयार करणे असा अर्थ असतो. राज्यातील भाजप सरकार आणि महापालिकेतील शिवसेना लोकशाही मार्गानेच सत्तेत आलेली आहे, याबाबत दुमत नाही. मात्र, व्यवस्था चालवण्याची त्यांची प्रेरणा गैरलोकशाही आहे. अतिवृष्टीला जागतिक पर्यावरणाचा संदर्भ आहे हे मान्य. पाऊस निसर्गाचे कर्तृत्व आहे हेही पटतेय…पण अनेक लोकप्रतिनिधींचे आपत्कालाचे दुर्घटना केंद्रित व सुमार आकलन कोट्यवधींच्या जीवाशी खेळत असल्याने मुंबई आणि टेक्सासची तुलना करावीच लागत आहे.
– सचिन पाटील
रायगड प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9423893536