मुंबई: मुबंई शेअर बाजार आज सकाळी उघडताच निर्देशांकात १४०० अंकांची घसरण झाली. येस बँक, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण, आणि कोरोना व्हायरसचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ४०० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला. निफ्टी सात महिन्यातील नीचांकी पातळीला पोहोचला आहे.
करोना व्हायरसमुळे आधीच शेअर बाजारात निरुत्साह असताना, येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले त्यामुळे शुक्रवारी बाजार आणखी गडगडला. आता सौदी अरेबियाने तेल बाजारपेठेला मोठा धक्का दिला आहे. एकेकाळचा सहकारी असलेल्या रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.
सप्ताहाच्या शेवटी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८ हजाराचा स्तर सोडत ३७ हजार ५७६.६२ वर येऊन ठेपला. तर २७९.५५ अंश घसरणीने ११ हजाराचा टप्पा सोडताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १० हजार ९८९.४५ पर्यंत स्थिरावला होता. निर्देशांकाच्या सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटींचे नुकसान झाले आहे.