मुंबई : गेल्या काही दिवसापासून कोरोना विषाणूमुळे मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. चीनने कोरोना विषाणूचा संसर्ग संपल्याचे जाहीर केल्यानंतर सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीत ११५ अंकाची वाढ झाली आहे. मुंबई शेआर बाजारात अनेक गुंतवणूक दारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आज बाजार सावरल्यानंतर दिलासा मिळाला आहे.
आजच्या सत्रात येस बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक ३४ टक्के वाढ झाली आहे. येस बॅंकेवरील निर्बंध उद्या संध्याकाळपासून दूर होणार असून बँकेचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरु होणार आहे. दरम्यान, मुडीज या पत मानांकन संस्थेने येस बँकेला सकारात्मक मानांकन दिले आहे. त्यामुळे बँकेच्या शेअरची आज गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. मागील ३ दिवसांत येस बँकेच्या शेअरमध्ये १०० टक्के वाढ झाली आहे.
याशिवाय धातू क्षेत्रात देखील मोठी खरेदी दिसून आली आहे. टाटा स्टील, जिंदाल स्टील, वेदांता, सेल हिंदाल्को आदी शेअर तेजीत आहे. दरम्यान आज बाजार उघडताच निर्देशांकांने ६०० अंकांची डुबकी घेतली होती. सेन्सेक्स ३१ हजार अंकांखाली गेला होता. मात्र त्यातून सावरला आणि खरेदीचा ओघ सुरु झाला. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी वधारून ७४.१५ वर गेला होता. सिंगापूर शेअर बाजार १०३ अंकांनी वधारला होता.