मुंबई, हैदराबाद, चेन्नई विमानतळावर हायअ‍ॅलर्ट!

0

नवी दिल्ली : मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद येथून उड्डाण घेणारे विमानाचे अपहरण एकाचवेळी करण्याचा कट दहशतवाद्यांनी शिजविल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर या विमानतळांवरील सुरक्षा वाढविण्यात आली असून, हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच, संशयास्पद व्यक्ती व प्रवाशांची झाडाझडती घेण्यात आली. एका हॉटेलामध्ये बसलेल्या सहा दहशतवाद्यांनी विमान अपहरणाचा कट रचला होता. त्यांचे बोलणे एका महिलेने ऐकले व त्यांनी विमानतळ सुरक्षा अधिकार्‍यांना तसा ई-मेल पाठवला होता. त्यानुसार, तातडीने सुरक्षेचे उपाय योजण्यात आले. या माहितीनुसार, हे दहशतवादी युवक मुंबई, चेन्नई किंवा हैदराबाद विमानतळावरून उड्डाण घेणारे विमान अपहरण करण्याचे नियोजन करत होते. त्यानंतर या विमानतळांना सुरक्षा यंत्रणांनी अक्षरशः घेराव घातला व तपासणी केली. तथापि, पोलिसांच्या हाती उशिरापर्यंत काहीही लागले नव्हते. मुंबईत आधीच दहशतवादविरोधी यंत्रणा सक्रीय आहे. उर्वरित दोन शहरात ती सक्रीय करण्याचे निर्देश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले होते.

पुणेसह देशभरातील विमानतळांवर हायअ‍ॅलर्ट
पुण्यातील विमानतळांसह देशभरातील विमानतळांवर या ई-मेलनंतर हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. ई-मेलमध्ये उल्लेख असलेल्या मुंबई, चेन्नई व हैदराबाद विमानतळांना तर सुरक्षा यंत्रणांनी अक्षरशः वेढा घातला होता. सकाळपासून या विमानतळांची कसून तपासणी करण्यात आली. संशयास्पद व्यक्ती व सामानांचीही तपासणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका हॉटेलात जेवणासाठी गेलेल्या महिलेला तिच्या शेजारी बसलेले सहा युवक विमान अपहरणाबाबत हळू आवाजात चर्चा करत असल्याचे ऐकू आले. रविवारी मुंबई, चेन्नई व हैदराबाद येथून विमान अपहरणाची तयारी ते करत होते. या महिलेने तातडीने याबाबतची माहिती सीआयएसफच्या पोलिसांना कळवली. त्यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन तपासणी मोहीम हाती घेतली होती.

अपहरणाच्या कटात 21 दहशतवादी
यापूर्वी एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करून ते अफगाणिस्तानातील काबूल येथे नेण्यात आले होते. त्यामुळे विमान अपहरणाबाबत भारत अत्यंत संवेदनशील आहे. तसेच, यापूर्वी जानेवारी 2015 मध्येही विमान अपहरणाची धमकी मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी आलेला ई-मेलची तातडीने तपासणी करून विमानतळांभोवतीची सुरक्षा वाढविली. रात्री उशिरापर्यंत कसून तपासणी सुरु होती. त्या महिलेने पाठविलेल्या ई-मेलनुसार अपहरणाच्या कटात एकूण 21 दहशतवादी सहभागी असून, ते अपहरणाचे षडयंत्र तडीस नेण्याबाबत नियोजन करत होते. यापूर्वीच जैश-ए-लष्करचे दहा दहशतवादी राजधानी दिल्लीत पोहोचले असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली होती. आजच्या या ई-मेलनंतर एअरपोर्ट सुरक्षा समन्वयन समितीची तातडीने बैठक होऊन विमानतळांवरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.

तिन्ही विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेबाबत अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलण्यात आली आहेत. गस्त वाढवण्यात आली असून, प्रवेशद्वारावरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विमानतळावरील सुरक्षा अधिकार्‍यांनी शहरातील पोलिस आणि इतर दलांशीही संपर्क साधला आहे.
ओ. पी. सिंह, महासंचालक सीआयएसएफ