मुंबई : उद्यापासून मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. मुंबईसारख्या अतिमहत्त्वाच्या शहरात कोट्यवधी लोकांच्या गर्दीत पार पाडणारा हा उत्सव निर्विघ्वपणे पार पाडावा म्हणून पोलीस आणि महापालिका प्रशासनही सज्ज आहे. त्याचबरोबर राज्याचे आपत्कालीन कक्ष आणि मुंबई महापालिकेतील आपत्कालीन नियंत्रण कक्ष यांच्यात समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांचे 45 हजारांचे दल सज्ज झाले आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिसंवेदनशील अशा ठिकाणी ड्रोनच्या मदतीनेही मुंबई पोलीस खास लक्ष ठेवणार आहेत.
गणेशोत्सवाची धामधूम जरी असली तरी शहरात घातपात घडवून आणली जाऊ शकते, त्यामुळे मुंबईला अक्षरशः छावणीचे स्वरूप येणार आहे. तब्बल 45 हजारांचे पोलीस दल मुंबईच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून पाहारा करणार आहे. त्याशिवाय निमलष्करी दल, होमगार्ड, रस्ता सुरक्षा आणि छात्रसेनेचे विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक यांचीही मदत घेतली जाणार आहे. गणपती आगमन आणि विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता मुंबई वाहतूक पोलिसांनीही आपला कृती आराखडा तयार केला आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी कंट्रोल रूम
वाहतूक नियंत्रणासाठी 5 कंट्रोल रूम बनवण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीवर एक मोठी कंट्रोल रुम बनवली जाणार आहे. या कंट्रोल रुमला शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, बांद्रा, पवई, मालवणी, मार्वे या ठिकाणी तयार करण्यात येणा-या कंट्रोल रूम जोडलेल्या असणार आहेत. 3000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे, 37 वॉच टॉवर, जीपीएस सिस्टम लावण्यात येणार आहेत. मिरवणूक काळात, 49 रस्ते पुर्णतः बंद केले जाणार आहेत.
ध्वनीवर नियंत्रण कायम
चौपांट्यांवर 3 हज़ार स्टिल प्लेट्स टाकल्या जाणारायत. मुंबईत 6 हजार सार्वजनिक गणपती आणि 1 लाख 21 हजार 226 घरगुती गणपती मुंबई असतात. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी आवाजाचे बंधन कायम असणार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 65 डेसिबलची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.
पोलीस सज्ज -45,000
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे -6,000
सीसीटीव्हींचा वॉच -3,000
डेसिबलची ध्वनीमर्यादा -65