मुंबै बँकेमध्ये खाते उघडणाऱ्या शिक्षकांचा पगार एक तारखेलाच

0

मुंबई (प्रतिभा घडशी) : शासनाकडून पगार वेळेत अदा झाला नाही तरी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (मुंबै बँक) खाते उघडणाऱ्या मुंबईतील 15 हजार शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात यापुढे दर महिन्याच्या एक तारखेलाच पगार जमा केला जाणार आहे. दुसरीकडे, मुंबै बँकेत खाते न उघडणाऱ्या 11 हजार शिक्षक, शिक्षकेतरांचा जुलै महिन्याचा पगारच रखडणार आहे. हे टाळण्यासाठी मुंबै बँकेत खाती न उघडलेले 11 हजार शिक्षक वा शिक्षकेतर कर्मचारी, शाळेच्या कुठल्याही संमतीशिवाय, स्वत:च परस्पर मुंबै बँकेच्या कोणत्याही जवळच्या शाखेत खाते उघडू शकतात, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबै बँकेमार्फत करण्याचा निर्णय 3 जून 2017 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला भाजपाबरोबर वैचारिक मतभेद असलेल्या विधान परिषदेतील शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या ‘शिक्षक भारती’ने तीव्र आक्षेप घेऊन आंदोलनचा पवित्रा घेतला आहे. ‘मुंबै बँक नको, राष्ट्रीयकृत बँक हवी,’ या मागणीसाठी संघटनेने मुंबईभर शिक्षक, शिक्षकेतरांच्या सह्यांची मोहीम राबवली आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या रूपाने ही बँक आपसूक सत्ताधारी भाजपाकडे आली. त्यामुळे या बँकेत शिक्षकांचे पगार जमा करण्यास विरोधक पाटील यांचा विरोध आहे. त्यानिमित्ताने तावडे आणि पाटील यांच्यातील संघर्षही बळावला आहे. परिणामी ‘शिक्षक भारती’चे वर्चस्व असलेल्या शाळांमधल्या शिक्षकांनी मुंबै बँकेत खाते उघडण्यास व्यवस्थापनाला विरोध सुरु केला आहे. परंतु खातीच उघडली गेली नसल्यामुळे शाळांकडून शासनाकडे अनुदानाच्या रकमेची बिलेच गेली नाहीत. अशातच शासनाने युनियन बँकेतील आपले शिक्षकांच्या पगाराचे खाते बंद केले आहे. त्यामुळे मुंबै बँकेत खाते न उघडणाऱ्या शिक्षकांचा जुलै महिन्याचा पगार मुंबै बँकेत खाते उघडेपर्यंत रखडणार आहे.

यापूर्वी मुंबईतील बहुतांशी शाळांमधल्या शिक्षकांचे पगार मुंबै बँकेतच जमा होत होते. कपिल पाटील यांच्या संघटनेच्या पुढाकाराने नंतर हे पगार युनियन बँकेत होऊ लागले. त्यामुळे मग शिक्षकांना बँकेकडून देण्यात आलेल्या एटीएम कार्डांवर शिक्षक भारती संघटनेचे नाव आणि लोगो होता. संघटनेच्या या फुकटच्या जाहिरातबाजीवर अनेकांनी आक्षेप घेतला होता.

संघटनेच्या दबावाची चर्चा
काही शाळांमध्ये शिक्षक असलेले संघटना कार्यकर्ते मुंबै बँकेत खाते उघडू नये म्हणून शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याच्या तक्रारी येत आहेत. खाते उघडण्यासाठी भरलेले अर्ज पुढे पाठवू नये म्हणून मुख्याध्यापकांवरही दडपण आणले जात आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बँक खाते उघडण्याचे अर्ज शाळेतच पडून आहेत.

स्थगितीचा खोटा प्रचार
मुंबै बँकेत खाते उघडण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्याचा खोटा प्रचारही जोरात चालल्याच्या तक्रारी आहेत. शाळांच्या स्टाफरूममध्ये ‘साहेबांच्या’ आवाजातील आवाहन मोबाईल फोनच्या स्पीकरवरून सर्वांना ऐकवले जात आहे. संघटनेच्या व्हॉट्स अॅपवरील मेसेजचे जाहीर वाचन केले जात आहे. “एक महिना पगार आला नाही तरी काही फरक पडणार नाही. काही दिवस त्रास होईल. मनाची तयारी ठेवा. काटकसर करा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यातून मार्ग निघेल,” असे आवाहन या पोस्टसमध्ये आहे.

शिक्षण निरीक्षकांचे 17 जुलैचे परिपत्रक
1. आपल्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन खाते मुंबई बँकेत उघडण्यात यावे, असे पूर्वी
कळवले आहे.
2. त्यानुसार, ज्यांचे खाते मुंबै बँकेत उघडण्यात आले आहे, त्यांनाच वेतन मिळेल.
3. ज्यांचे खाते उघडले गेले नाही, त्यांना वेतन मिळणार नाही.
4. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाही किंवा ते मिळण्यास विलंब होईल, त्यासाठी कार्यालय प्रमुख या नात्याने

संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य जबाबदार राहतील.

मुंबै बँकेचेच दडपण
आमचे शिक्षक कार्यकर्ते कोणत्याही शिक्षकावर दबाव आणत नाहीत. याऊलट बुडालेल्या मुंबै बँकेचे अधिकारीच शिक्षकांवर खाते उघडण्यासाठी दडपण आणत आहेत. मुंबै बँकेत 412 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विनोद तावडे यांनीच ते विरोधी पक्षात असताना केला होता. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असताना ते बुडणाऱ्या सहकारी बँकेत का वळवावे? मुंबै बँकेत खाते उघडण्यास शिक्षकांचाही विरोध आहे.
– कपिल पाटील

परस्पर खाते उघडा
दरम्यान, मुंबै बँकेत खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यालाच पगार मिळेल. शाळा खाते उघडण्यास सहकार्य करत नसेल शिक्षक वा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परस्पर खाते उघडावे, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. मुंबै बँकेत काते उघडणाऱ्यालाच पगार मिळेल. इतरांना मिळमार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक वा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असहकार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांविरूद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

कोणत्याही शाखेत खाते उघडा
मुंबै बँक बुडणारी आहे की तरणारी हे बँकेची बॅलन्सशीट आणि ऑडिट रिपोर्ट सांगेल. कपिल पाटील यांनी आपल्या स्वार्थासाठी शिक्षकांचा बळी देऊ नये आणि त्यासाठी मुंबै बँकेची प्रतीमा मलीन करू नये. शाळा सहकार्य करत नसल्यास कोणत्याही शिक्षक वा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुंबै बँकेच्या कोणत्याही शाखेत आपले खाते उघडावे. कोणत्याही कारणामुळे सरकारने शिक्षकांचा पगार वेळेवर जमा केला नाही तरी आम्ही एक तारखेलाच त्यांना पगार देऊ.
– प्रवीण दरेकर

युनियन बँकेपेक्षा जास्त सेवा

                     युनियन बँक                  मुंबै बँक
ओव्हरड्राफ्ट        25,000                     2,00,000
कर्ज व्याजदर      11.5                          9.5
मोफत सेवा          –                     चेकबुक, पासबुक, एटीएम कार्ड
एटीम व्यवहार      तीन                           पाच