मुंबई:- मुंब्रा बायपासवरील पारसिक पुलाची अवस्था खस्ताहाल झाली असून या पुलाचे बेअरिंग सरकत असल्याबाबत गेल्या वर्षी अहवाल येऊन देखील अद्यापही मोठ्या वाहनांची वाहतूक बंद होत नसल्याने कुठल्याही क्षणी पूल कोसळू शकतो अशी भीती विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जितेंद्र आव्हाड, नसीम खान यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे व्यक्त केली. जेएनपिटी वरून नाशिक आणि औरंगाबादला जाणाऱ्या जड वाहतुकीच्या गाड्यांना दोन ठिकाणी टोल लागत असल्यामुळे ही सगळी वाहने मुंब्राच्या पारसिक पुलावरूनच वाहतूक करत असून यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी याबाबत दोन दिवसात मिटिंग लावून निर्णय घेणार असल्याचे विधानसभेत सांगितले.
गेल्यावर्षी या पुलाच्या धोकादायक स्थितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलीस निरीक्षकांना पत्र दिले आहे. त्यामध्ये या पुलाची अवस्था अत्यंत बिकट असून बेअरिंग हालत असल्याचा रिपोर्ट एका नामांकित संस्थेने दिला असल्याचे सांगितले आहे. या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने न्यावी याबाबत देखील यामध्ये सूचना केल्या आहेत. सदर पुलाच्या दुरुस्तीबाबत निर्णय निविदा स्तरावर असल्याचे गेल्या वर्षी दिलेल्या या पत्रात सांगितले आहे. मात्र याबाबत अद्याव कुठलीही कार्यवाही झालेली नाही. केवळ टोल वाचविण्यासाठी या पुलावरून दिवस रात्र वाहतूक सुरू असते. रोज 5 हजार पेक्षा जास्त ट्रक या पुलावरून जात असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.