ठाणे । नेहमीच वादाच्या भोवर्यात अडकलेल्या मुंब्रा येथील बायपास रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला मुहर्त मिळाला आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 16 एप्रिलपासून हे काम हाती घेण्यात येणार आहे. या बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुढील दोन महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबई, नवी मुंबईसह इतर महापालिकांना वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत जेएनपीटीमधून सोडण्यात येणार्या कंटेनरची वाहतूक केवळ रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्यात येणार आहे.
आयजीपीएल कंपनी ते खोणी सर्कल हा तळोजा एमआयडीसीतून जाणारा रास्ता, चक्कीनाका ते नेवाळी फाटा हा श्रीमलंगगड रस्ता आणि गोविंदवाडी बायपाससह इतर कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. बायपास दुरुस्तीचे काम जवळपास 2 महिने चालणार असून त्यासाठी जेएनपीटी, नवी मुंबई, ठाणे येथील प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी एकत्रित बैठक घेणार आहेत. या बैठकीत वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार वाहतुकीच्या नियोजनाची आगाऊ प्रसिद्धी वाहनचालकांसाठी करावी, असे निर्देश या अधिकार्यांना देण्यात आले आहेत. वाहतूक कोंडीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात करण्यात आले होते. या बैठकीत शिळफाटा, मुंब्रा बायपास रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामामुळे होणार्या वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यात आले.