मयत तरूण लुटारू असल्याचा गावकर्यांचा संशय
धुळे । मुकटी शिवारात हॉटेल बालाजीच्या पुढे असलेल्या महाविर जैन यांच्या शेतात पायवाटेवर तरुण मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे दिसत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस स्टेशनचे पीआय वसावे, एलसीबीचे पीआय परदेशी आणि श्वान पथक घटनास्थळी रवाना झाले होते. मृत तरुणाचा कोणीतरी खून केला असावा असा अंदाज मानला जात होता. मात्र मृत तरुण हा लुटारुंपैकी एक असल्याचे जवळपास निष्पन्न झाले आहे
१९ रोजी चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न
माहितीप्रमाणे, १९ सप्टेंबर रोजी रात्री पारोळा रोड चौफुली येथे प्रवासी म्हणून तीन जण नागपूरच्या दिशेने जाणार्या स्वीफ्ट गाडीत बसले होते. त्यांनी हत्याराचा धाक दाखवून कार चालकाला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालक घाबरण्याचे नाटक करत आणि त्यांना बोलण्यात गुंतविले, मुकटी शिवारातील बालाजी हॉटेलजवळ कळवण- जळगाव बस प्रवाशांना उतरविण्यासाठी थांबलेली असतांना कार चालकाने चोर-चोर असा मोठ्याने आरडा-ओरडा सुरु केला. चालकाने आरडाओरड सुरु केल्याने प्रवाशी व नागरीक धावत आले. लोकांना येतांना पाहुन कारमधील चोरट्यांनी धुम ठोकली. तिघे भामटे वाट मिळेल तिकडे पळत सुटले. त्यातील एकचोर जैन यांच्या शेतातील बांधावरुन पळू लागला. पळतांना तोल जावून तो दगडावर पडल्याने डोक्याला गंभीर जखम झाली. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचेही पी.आय. बोलतांना सांगितले. डोक्यावर आपटून पडल्याने गंभीर जखमी होवून मृत्यू झाला असावा आणि मृत तरुण म्हणजेच मुकटी शिवारात पडलेला असल्याचे तर्कवितर्क निघत आहे.