गाले । पहिल्या डावात त्रिशतकी आघडी मिळवूनही यजमान संघाला फॉलोऑन न देणार्या भारतीय संघाने दुसर्या डावात आपली आघडी 498 धावांपर्यंत वाढवली. श्रीलंकेला पहिल्या डावात 291 धावांवर गुंडाळल्यावर दुसर्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला. दुसर्या डावात भारताची अडखळत सुरुवात झाली. पहिल्या डावात शतक ठोकणार्या शिखर धवन (14) आणि चेतेश्वर पुजारा (15) धावांवर झटपट बाद झाले. सुरुवातीला मिळालेल्या या झटक्यानंतर पहिल्या डावात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या अभिनव मुकुंद आणि कर्णधार विराट कोहलीने डाव सावरला. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी 133 धावांची भागिदारी केली. शतकाकडे वाटचाल करत असताना अभिनव मुकुंद गुणतलिकाच्या गोलंदाजीवर 81 धावांवर बाद झाला. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 बाद 189 धावा केल्या. विराट कोहली 76 धावांवर खेळत होता. त्याआधी श्रीलंकेचा डाव 291 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून दिलरुवान परेराने 92 धावा केल्या. असेला गुणरत्नेच्य अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याने तो फलंदाजीस आला नाही.
द्रविडनंतर विराट
या सामन्यात पहिल्या डावात 309 धावांची आघाडी मिळवूनही भारतीय संघाने यजमान संघाला फॉलोऑन दिला नाही. 300 हून जास्त धावांची आघाडी घेउनही फॉलोऑन न देण्याची भारतीय क्रिकेटमधली ही दुसरी वेळ आहे. 2007 मध्ये द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला फॉलोऑन दिला नव्हता.
जडेजाच्या तीन विकेट्स
सामन्याच्या तिसर्या दिवशी रविंद्र जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने शतकाच्या आधीच अॅजेलो मॅथ्यूजला (83) बाद करत त्याची आणि दिलरुवान परेराची भागीदारी संपुष्टात आणली. मॅथ्यूज कोहलीकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर जडेजाने रंगाना हेरथला (9) अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद करत श्रीलंकेला सातवा झटका दिला. भारतासाठी आठवी विकेट हार्दिक पंड्याने मिळवली. कसोटी पदार्पण करणार्या पंड्याने नुवान प्रदीपच्या (10) दांड्या गुल केल्या. डावातील शेवटची विकेट जडेजाने मिळवली. उपाहारानंतर काही वेळाने जडेजाने लाहिरू कुमारचा (2) त्रिफळा उडवत श्रीलंकेचा डाव संपुष्टात आणला.
श्रीलंकेवर विक्रमी आघाडी
भारताने पहिल्या डावात श्रीलंकेवर मिळवलेली 309 धावांची आघाडी ही आतापर्यंत यजमान संघावर मिळवलेली सर्वात जास्त धावांची आघाडी आहे. याआधी 2015 मध्ये याच स्टेडियमवर भारताने श्रीलंकेवर 192 धावांची आघाडी घेतली होती. हा विक्रम आता मोडीत निघाला आहे. गॉलेवर खेळलेल्या त्या सामन्यात भारतीय संघाला आघाडी मिळवूनही नंतर पराभव पत्कारायला लागला होता.
विराटपेक्षा धोनी पुढे
कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीला आतापर्यंत सात वेळा प्रतिस्पर्धी संघावर फॉलोऑन लादण्याची संधी मिळाली होती. कोहलीने मात्र त्यापैकी केवळ दोन वेळा प्रतिस्पर्धी संघाना फॉलोऑन देत पुन्हा फलंदाजी करण्यास मैदानात उतरवले होते. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र याबाबतीत विराटच्या पुढे होता. धोनीला पाच सामन्यांमध्ये फॉलोऑन देण्याची संधी मिळाली होती. त्यापैकी चार सामन्यांमध्ये धोनीने प्रतिस्पर्धी संघावर फॉलोऑन लादला.