मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे पुण्यातील पहिल्या ‘इनोव्हेशन हब’ची उभारणी

0

पुणे । भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे उभारण्यात आलेल्या आणि सर्वांसाठी खुल्या असणार्‍या पुण्यातील पहिल्या इनोव्हेशन हबचे उद्घाटन 28 फेब्रुवारीला होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते दुपारी 4 वाजता सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र येथे होणार आहे. याप्रसंगी दासॉल्ट सिस्टीमच्या संशोधन व विकास विभागाचे मुख्य अधिकारी सुदर्शन मोगासले व नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्सचे (एनसीएसएम) संचालक समरेन्द्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.

आंतरशालेय स्पर्धा
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे 27 व 28 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. या आंतरशालेय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन आयुकाचे संचालक डॉ. सोमक रायचौधरी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहिती भारतीय विद्या भवनाचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, इनोव्हेशन हबचे उपसंचालक संदीप नाटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अविष्कार केंद्र उभारणीला प्रोत्साहन
दैनंदिन जीवनातील छोट्यामोठ्या समस्यांवर उपाय शोधता यावेत, यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन भारत सरकार इनोव्हेशन हब अर्थात अविष्कार केंद्र उभारणीला प्रोत्साहन देत आहे. या समितीकडून निधी मिळवणारी विज्ञानशोधिका पहिली खासगी संस्था आहे, असे प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांतील कल्पक विचारांना वाव देण्यासाठी दरवर्षी विज्ञान दिनाच्या निमित्ताने ही प्रकल्प स्पर्धा भरविण्यात येते. यंदा यामध्ये जवळपास 70 प्रकल्प पाहता येणार आहेत. त्यातील उत्कृष्ट प्रकल्पांना विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत, असे संदीप नाटेकर यांनी सांगितले.

सरकारचा 50 टक्के खर्च
या इनोव्हेशन हबसाठी कोलकाता येथील नॅशनल सेंटर फॉर सायन्स म्युझियमकडून मान्यता मिळाली आहे. या हबच्या उभारणीत विज्ञानशोधिका केंद्राने 50 टक्के आणि भारत सरकारच्या वतीने 50 टक्के खर्च केला आहे. वर्षभरापूर्वी या हबच्या उभारणीला सुरुवात झाली होती. येत्या 28 पासून हे हब सर्वांसाठी खुले होणार आहे. या इनोव्हेशन हबमध्ये मॅकॅनिकल इनोव्हेशन सेंटर, अ‍ॅडव्हान्स्ड फॅब्रिकेशन अँड प्रोटोटायपिंग सेंटर, कम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक सेंटर असणार आहे. येथे विविध प्रकारची अवजारे, मशिनरी, प्रणाली उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स कार्यशाळाही आयोजिल्या जाणार आहेत, अशी माहिती अनंत भिडे यांनी यावेळी दिली.