मुक्ताईचा जयघोष ; श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळ्यात भाविक तल्लीन

0

पंढरीच्या परमात्मा पांडुरंगासह संतांच्या पादुका पालखी सोहळ्याचे आगमन

मुक्ताईनगर- श्री संत मुक्ताई 721 व्या अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्ताने श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत अनंतकोटी ब्रम्हांडनायक पांडूरंग परमात्मा संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज पालखींच्या उपस्थितीत आई मुक्ताई 721वा अंतर्धान समाधी सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला. तत्पूर्वी बुधवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व गाथा भजनांची सांगता करण्यात आली. श्री संत नामदेव पालखी, पंढरीशच्या परमात्मा पांडुरंगाच्या पादुका, संत निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखी सोहळ्यांचे मुक्ताई नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले .

मुक्ताईचा जयघोष, हजारो भाविकांची उपस्थिती
संत नामदेव फडाच्या वतीने आई मुक्ताईची मानाची महापूजा पहाटे करण्यात आली. सकाळी नऊ वाजता श्री पाडुरंग व संत निवृत्तीनाथ पालखीचे स्वागत करण्यात आले. दुपारी 12 वाजता हभप केशवदास नामदास महाराज यांचे गुलालाचे पुष्पवृष्टीचे किर्तन झाले. दुपारी दोन वाजता खामणीकर ग्रामस्थांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री 8 ते 10 दरम्यान हभप जयंत महाराज, गोसावी वंशपरंपरागत पुजारी संत निवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वर यांचेकीर्तन झाले तसेच गावोगावीच्या दिंड्या व भाविक याची देही याची डोळा हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी आतुर झालेले भाविक रणरणत्या उन्हातदेखील मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन झालेले दिसून आले.