मुक्ताईच्या जयघोषाचा संतनगरीत गजर

0

मुक्ताईनगर– आदिशक्ती संत मुक्ताई तीर्थक्षेत्र असलेल्या मुक्ताईनगरातील जुन्या मुक्ताई मंदिर व नवीन उपाय मंदिरात रविवारी खर्‍या अर्थाने एकादशीनिमित्त यात्रोत्सवाला सुरुवात झाली. जवळपास दोनशे दिंड्या तर लाखो भाविक मुक्ताईनगरीत झाले आहेत. टाळ-मृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताई यांचे गुणगान करत मुक्ता वारी मुक्ताबाईच्या नामघोषात समस्त मुक्ताईनगरी दुमदुमली होती. एकादशीनिमित्त 11 रोजी नगर परीक्रमा पार पडली. मंगळवार, 13 रोजी महाशिवरात्रीस मुक्ताईसमवेत चांगदेवाच्या दर्शनाला दिंड्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने रवाना होणार आहेत तर 14 रोजी पारणे सोडून वारकरी माघारी परततील. मुक्ताई संस्थान, कोथळी-मुक्ताईनगर वतीने भाविकांना फराळ महाप्रसाद वाटप झाला. गाभार्‍याजवळून भाविकांनी दर्शन घेतले.

संत नगरीत मुक्ताईचा गजर ; लाखो भाविकांनी घेतले दर्शन
मुक्ताईनगरी समाधीस्थळ जुने कोथळी मुक्ताई मंदिर व नवीन मुक्ताईनगर येथे यात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. मुक्ताबाई, मुक्ताबाई या अवघ्या नामघोषात व टाळ मृदुंगाच्या पावन गजरात राज्याच्या कानाकोपर्‍यासह विदर्भ, मध्यप्रदेश व मराठवाडा या भागातून मोठ्या प्रमाणावर जवळपास 200 दिंड्यांचे रविवार पर्यंत मुक्ताईच्या चरणी आगमन झाले. लाखो भाविकांनी श्री संत मुक्ताईचे दर्शन घेतले.

कोथळीत महापूजा
विजया एकादशीचे औचित्य साधत रविवारी संत मुक्ताई यात्रेचा दिवस असल्याने रविवारी जुने कोथळी येथील मुक्ताई मंदिरात पहाटे चार वाजता खासदार रक्षा खडसे यांचे हस्ते आदिशक्ती मुक्ताईचा अभिषेक व पूजा विधीवत पार पडली. नवीन मुक्ताई मंदिरात पंजाब पाटील यांनी सपत्नीक पूजा व अभिषेक केला. जुन्या कोथळी मंदिरात रविवारी एकादशीनिमित्त माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून तसेच नवीन मंदिरात संस्थानकडुन भाविकांना फराळाची व्यवस्था करण्यात आली.