मुक्ताईनगरच्या व्यापार्‍याला लुटले ; बोदवडच्या आरोपींविरुद्ध गुन्हा

0

मुक्ताईनगर- मुक्ताईनगरच्या व्यापार्‍याकडील 40 हजार रुपये हिसकावल्याची घटना 27 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता मुक्ताईनगर ते बोदवड रोडवरील कालिंकामाता मंदिराचे कमानीसमोर घडली होती. याप्रकरणी बोदवड येथील सहा जणांविरूद्ध मुक्ताईनगरात रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगरचे व्यापारी मोहंमद रफीक शेख शब्बीर हे सुरेश निंबाजी प्रधान यांच्यासह सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथून कापूस विक्री करून 27 रोजी आयशर गाडीने (एम.एच.14 डी.एम.4395) ने मुक्ताईनगरकडे येत असताना बोदवड रस्त्यावरील कालिंकामाता मंदिराच्या कमानीसमोर आरोपी सागर तोरे, विशाल देवकर, किसन उर्फ शेंड्या कैलास सोनवणे व त्यांच्या तीन साथीदारांनी (सर्व रा.बोदवड) यांनी रस्त्यात दुचाकी आडवी लावून आयशर गाडी थांबवली. यानंतर मोहंमद रफीक व सुरेश प्रधान यांना लोखंडी फायटरने मारहाण करुन जखमी केले. त्यांचेजवळील 40 हजार हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी मोहंमद रफीक यांचे फिर्यादीवरून मुक्ताईनगरात सागर तोरे, विशाल देवकर, किसन सोनवणे व अन्य सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अशोक उजगरे करत आहे.