Accused in five robberies including Muktainagar in the net of Jalgaon Crime Branch जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील सराफाला लुटणार्या गँगचा जळगाव गुन्हे शाखेने पर्दाफाश करीत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी अन्य चार दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे.
चाकू हल्ला करीत लुटले होते सराफाला
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे निलेश वसंत सोनार (३२, रा.नरवेल, ता. मुक्ताईनगर) यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. ते दररोज दुकानातील दागिने आणि पैसे घरी घेऊन जात असतात. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन घरी आपल्या दुचाकीवरून परत जात असताना नरवेल फाट्याजवळ एका पल्सरवर चेह-यावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने व दगडाने मारहान करुन निलेश सोनार यांच्याकडील ९ लाख रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये किंमतीचे २ किलोचे चांदीचे दागिने आणि ८ लाख रुपये रोख असा एकूण १७ लाख ८० हजाराचा ऐवज बळजबरीने लुटून नेले. हा झटापटीत चोरट्यांनी निलेश सोनार यांच्या हाताला आणि पायाला चाकूसारख्या शस्त्राने वार केल्यामुळे ते जखमी झाले.
पाच आरोपींना अटक
संशयित आरोपी सुनील मिस्त्रीलाल जाधव (२३, अंजाळे, चिंचखेडा, ता.धुळे, ह.मु.मच्छी बाजार, सुप्रीम कॉलनी, धुळे), प्रकाश वसंत चव्हाण (३०, रा. भिकनगाव, मध्यप्रदेश, रामदेवबाबा मंदिराजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव), आकाश दिलीप पवार (२४, मूळ रा.लोणवाडी, ता.जळगाव, ह.मु.भवानी चौक, सुप्रीम कॉलनी, जळगाव), विशाल देविदास मराठे (२३, रा.रायपूर कंडारी, ता.जळगाव) व विनोद विश्वनाथ इंगळे (३४, रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांना अटक करण्यात आली. संशयीतांकडून १२ लाख ८० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकींचा समावेश आहे. या पाचही संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आरोपींनी जामनेर, पाचोरा येथे एक तर एमआयडीसी हद्दीत दोन दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे. जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.