मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील प्रवर्तन चौकातल्या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून याबाबत पालिकेच्या सभेत ठराव मांडण्यात यावा अशा सूचना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केल्या.
आमदार खडसे हे भाजपा आणि आजादी महोत्सव समितीच्यावतीने आयोजित माजी सैनिक आणि प्रगतशील शेतकरी यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात सकल मराठा समाजाच्यावतीने संदिप देशमुख यांनी आ.एकनाथराव खडसे यांच्याकडे मुक्ताईनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी केली असता आ.खडसे यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा नजमा तडवी व सर्व नगरसेवकांना मुक्ताईनगर नगरपंचायतच्या प्रथम मासिक मीटिंगमध्ये प्रवर्तन चौकामधील उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा ठराव करण्याच्या सूचना केल्या. यावेळी सकल मराठा समाज आणि सर्व समाजातर्फे माजी महसुल कृषी मंत्री तथा आ. एकनाथराव खडसे यांचा संदिप देशमुख, निवृत्ती पाटील, विनोद सोनवने, राजू माळी, विलास धायडे, सुनिल काटे, दीपक साळुंखे, मनोज तळेले, रामभाऊ पाटील, राहुल पाटील आदी समाज बांधवांनी सत्कार केला.
या कार्यक्रमाला खा. रक्षाताई खडसे, नगराध्यक्षा नजमाताई तडवी, पं.स. सभापती शुभांगीताई भोलाणे,भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर आजादी महोत्सव समितीचे सदस्य मतीन शेख, दीपक चौधरी, संदीप जोगी आदींसह नागरिक उपस्थित होते.