नगरपंचायतीतर्फे दवंडीद्वारे सूचना ; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
मुक्ताईनगर- शहरवासीयांना टंचाईचे चटके जाणवत असून नगरपंचायतीतर्फे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नागरीकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. पूर्णा नदी पात्रातील जलपातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्या जॅकवेल उघड्या पडल्याने त्याचा परीणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
पाणी उशाला आणि कोरड घशाला
पूर्णा नदीचा विस्तीर्ण जलसाठा असूनही पाणी उशाशी आणि कोरड घशाशी याचा प्रत्यय शहरवासीयांना येत आहे. नियोजन अभावामुळे उन्हाळा व पावसाळ्यात शहराला कृत्रिम पाणीटंचाईस तोंड द्यावे लागते. संभाव्य टंचाईस तोंड देण्यासाठी दोन विहिरी अधिग्रहित करणयात आल्या आहेत तर शहरात 34 हातपंप करण्यात येत आहेत. चार दिवसांपूर्वी जळगाव भूजल सर्वेक्षण विभागाचे वरीष्ठ भूवैज्ञानिकांच्या दोन पथकाने पाहणी अंती हातपंप करण्यासाठी संभाव्य ठिकाणे शोधली. पथकाने ठरवून दिलेल्या ठिकाणावर हातपंप केले जाणार आहे. शहरात पूर्णा नदीसह अन्य चार ठिकाणच्या विहिरी अशा पाचपेक्षा अधिक उद्भवावरून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काळात तांत्रिकदृष्ट्या परीपूर्ण पाणीपुरवठा योजना झाली असती तर दर वर्षी येणारे टंचाई संकट टळले असते, असा नागरीकांचा सूर आहे.
पूर्णा नदीची जलपातळी खालावली
पूर्णा नदीपात्रातील जल पातळी झपाट्याने खालावली आहे. नदीपात्रात पाणीपुरवठ्यासाठी असलेले सर्वच जॅकवेल उघड्या पडल्या आहेत. दरवर्षी नदीपात्रात गाळ मोठ्या प्रमाणात वाढत असून विस्तीर्ण पात्रात पाणी उथळ अवस्थेत आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. अशात हातनूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्याने पाणी पातळी चिंताजनक स्तरावर घसरली आहे. यातून विहिरींचे जलस्तर प्रचंड खालावले आहेत. शेत-शिवारासह गावातील विहिरी टप्प्यविर आल्या आहेत तर कुपनलिकांचे पाणीही उतरले आहे. शहरात अनेक खाजगी घरगुती कुपनलिका पाणी उतरल्याने बंद पडल्या आहेत. शहरातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगरपंचायती च्या वतीने करण्यात आले आहे.