मुक्ताईनगरातील स्टेट बँकेचा भोंगळ कारभार

0

तीन पैकी केवळ एकच काऊंटर सुरू ; महागड्या मशनरी ठरताय शोभेच्या वस्तू

मुक्ताईनगर- शहरातील मुख्य स्टेट बँकेत सोयी-सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याने खातेधारक संतप्त झाले आहेत. आजूबाजूच्या खेड्यांवरील तसेच मुक्ताईनगर शहरातील हजारो नागरीकांचे या बँकेत खाते असलेतरी तीन पैकी केवळ एकाच काऊंटर सुरू राहत असल्याने खातेदारांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. विविध प्रकारचे फॉर्म भरण्यासाठी तसेच पासबुक प्रिंटिंग करण्यासह पैसे भरणे व काढण्यासाठी एकच काउंटर उपलब्ध असल्याने खातेदारांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. बँक प्रशासन समस्या सोडवण्यास सपशेल अपयशी ठरले आहे.

लाखोंच्या मशनरी नादुरुस्त
बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता या परीसरातील खातेदार वेळेवर कर्ज भरत नसल्याचे कारण पुढे केले जाते मात्र या शाखेला एटीएम व सीडीएम मशीन असल्यावर सुद्धा या मशनरी शोभेच्या वस्तू ठरत असून या मशनरी नेहमी नादुरुस्त असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. पासबुक प्रिंटिंग मशीनदेखील नादुरुस्त अवस्थेत आहे. बँकेला पाहिजे तेवढ्या प्रमाणात कर्मचारीवर्ग नसल्याचे सांगून काऊंटर बंद केले जात असून इतर कामांना महत्त्व दिले जात असल्याचा आरोप आहे. ग्रामीण भागातून येणारा खातेदार तास न तास रांगेत उभे राहून सुद्धा कामे होत नसल्याने वेळप्रसंगी बँकेचे वेळ संपल्याचे सांगून त्यांना माघारी पाठवले जात आहे. व्यवस्थापकांकडे तक्रारी करून सुद्धा कानाडोळा केला जात आहे.

नेट बँकींगचा अजब सल्ला
खातेदारांमध्ये भारतीय स्टेट बँकेबद्दल अनास्था निर्माण झल्याने खातेदार आपली खाते बंद करण्याच्या तयारीत असताना खातेदारांनी नेट बँकिंग करावे त्यामुळे त्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, अशी आश्चर्यकारक उत्तरे व्यवस्थापकांकडून मिळत आहेत. प्रत्येक खातेदाराला नेट बँकिंग जमणारे नाही शिवाय ग्राहक 40 किलोमीटर अंतर कापून तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या आशेने बँकिंग व्यवहारासाठी येतात. बँकेत कर्मचारी वर्ग पुरेसा असल्यावर सुद्धा याठिकाणी काउंटर बंद करून लांबच्या लांब रांगा लावल्या जात असलयाने वयोवृद्धांसह लहान मुले , विद्यार्थी व इतर खातेदारांना मनस्ताप सोसावा लागत आहे. बँकेत पाण्याची सुविधा नसल्याने ग्राहकांची भर उन्हाळ्यात चांगलेच होत आहेत. वरीष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेवून सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी खातेदारांची अपेक्षा आहे.