मुक्ताईनगरातील 413 घरांच्या पुर्नवसन प्रश्न सुटण्याची आशा

मुख्यमंत्र्यांकडून वाढल्या अपेक्षा : मुक्ताईनगर शहरातील चौथ्या टप्प्यातील पुर्नवसन प्रश्न जिल्हाधिकार्‍यांकडे प्रलंबित

Chief Minister’s visit increases hope: Hope to solve the rehabilitation problem of 413 houses in Muktainagar
मुक्ताईनगर (संदीप जोगी) :
हतनुर प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे अंशत: बाधीत झाल्याने मुक्ताईनगरचे चार टप्प्यात पुनर्वसन करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. पुनर्वसनातील पहिले तीन टप्पे पूर्ण झाले आहेत उर्वरीत चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील जुने गावठाण परीसरातील 413 घरांचे पुनर्वसन रखडलेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रखडलेल्या 413 घरांचे पुनर्वसन करण्याविषयी प्रशासनाच्या शासकीय प्रक्रियेला गती देण्याचे आदेश देत पुनर्वसनाची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी पुनर्वसनधारक करीत आहे.

टप्पा क्रमांक चारला मंजुरी मिळण्याची मागणी
मुक्ताईनगर शहरातील उर्वरीत 413 घरांच्या पुनर्वसन टप्पा क्र.4 ला खास बाब म्हणून तात्काळ मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 17 मे 2022 रोजी केली होती. यावेळी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी लागलीच संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांना खास बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव प्रलंबित
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील मुक्ताईनगर शहरातील एकूण 1664 घरे पुनर्वसित करणे आवश्यक असल्याने त्यापैकी आज पावेतो सन 1976 टप्पा क्र. 1 मध्ये 888 घरे, सन 1986 टप्पा क्र.2 मध्ये 123 घरे व सन 2012 टप्पा क्र.3 मध्ये 240 असे 1251 घरांचे पुनर्वसन झाले आहे तसेच एकूण एक हजार 664 घरांपैकी 413 घरांचे पुनर्वसन करणे आवश्यक असून प्रस्ताव जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे प्रलंबित आहे तसेच गोळे समितीच्या अहवालानुसार प्रकल्प अहवालाच्या व्यतिरीक्त 17 अतिरिक्त गावांचे पुनर्वसन करणेबाबत शिफारस आहे. मूळ प्रकल्प अहवालानुसार व गोळे समितीच्या शिफारशीनुसारच्या गावांच्या संपादनानंतरही विविध गावांच्या काही ज्यादा घरे संपादनाच्या मागण्या होत्या. त्यानुसार नऊ गावातील काही घरांचे संपादन व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन निर्णय क्र. आरपीए-3296/ प्र.क्र.150/2-3 दिनांक 9 जुलै-1999 नुसार मान्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे दि. 26 जून 1986 शासन परिपत्रकानुसार नुसार गावांचे विशेष बाब म्हणून अतिशय सबळ व योग्य कारण असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुक्ताईनगर शहरातील उर्वरित घरांच्या पुनर्वसनास (टप्पा क्र.4 ला) खास बाब म्हणून तत्काळ मंजुरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

खडसेंचा पाठपुरावा मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष
21 मे 2015 रोजी मुक्ताईनगर पुनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यामार्फत राज्य शासनाकडे उर्वरित चौथा टप्प्याचे पुनर्वसनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. नंतर ऑगस्ट 2015 मध्ये पुनर्रचना संदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती या बैठकीत मुक्ताईनगर शहरातील उर्वरित चौथा टप्प्यातील घरांचे संरक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नंतर याला प्रशासनाकडून गती मिळालीच नाही.

‘मेरी’ संस्थेने केले 2009 मध्ये सर्वेक्षण
हतनुर धरणातील गाळामुळे उपयुक्त आणि मृत जलसाठ्यात घट होत आहे या संदर्भात नाशिक येथील ‘मेरी’ संस्थेने पाटबंधारे विभागाच्या सहकार्याने 2009 मध्ये सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या अहवालात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत त्यामुळे मुक्ताईनगर जुने गावठाणाच्या चौथ्या टप्प्यातील 413 घरांचे पुनर्वसन त्वरीत होणे गरजेचे आहे.

1664 घरे बाधीत
1972-73 मध्ये हतनूरच्या बॅकवॉटरमुळे मुक्ताईनगरातील एक हजार 664 घरे बाधीत झाली. यात बाजार गल्लीतील 328, देशमुख गल्ली 236, काजीपुरा 142, चाळीस मोडला 104, वंजारवाडी 103 , पाटील गल्ली 102, धनगर वाडा 113 घरांचं अन्य भागातील एकूण 1664 घरे बाधित झाली (स्रोत-16 ऑगस्ट 2007 रोजी ग्रामपंचायत ने समितीला दिलेले पत्र.)