मुक्ताईनगरातून ऐश्‍वर्या रॉयने केला नॉनक्रिमेलेयरसाठी अर्ज !

0

मुक्ताईनगर सेतु सुविधा केंद्र चालकाची बेफिकीरी ; तहसीलदारांनी प्रकरण न तपासताच पाठवले प्रांताधिकार्‍यांकडे

भुसावळ (गणेश वाघ)- विश्‍वसुंदरी ऐश्‍वर्या रॉयचा चक्क मुक्ताईनगरातून नॉन क्रिमेलेयरसाठी अर्ज…. हेडिंग वाचून दचकलात ना ! मात्र बातमी अगदी खरी असून ही किमया मात्र मुक्ताईनगरातील सेतु सुविधा केंद्र चालकाच्या बेफिकीरीमुळे घडली आहे शिवाय मुक्ताईनगर तहसीलदार श्याम वाडकर यांनीदेखील प्रकरण न पाहताच मंजुरीसाठी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे पाठवल्याने प्रशासनातील अधिकारी दाखल्यांबाबत किती सजगपणे काम करतात? याचा प्रत्ययही या निमित्ताने आला आहे. या गंभीर प्रकाराची प्रांतांनी दखल घेत संबंधित सेतु सुविधा केंद्र चालकाला कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे.

ऐश्‍वर्याचा फोटो पाहून प्रांतही दचकले
जिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत, अशा विश्‍वसुंदरी राहिलेल्या ऐश्‍वर्या रॉयनेच चक्क मुक्ताईनगरातील सेतु सुविधा केंद्रातून नॉन क्रिमीलेयरसाठी अर्ज केल्याचे प्रकरण पाहताच प्रांताधिकारी काही वेळासाठी स्तब्ध झाले. संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनाही सुरूवातीला हसायला आले. मुक्ताईनगरातील एका सेतू सुविधा केंद्र चालकाने मयूर बाबूराव सोनार (मुक्ताईनगर) यांच्या नॉन क्रिमीलेयर प्रकरणासाठी त्यांच्या छायाचित्राऐवजी चक्क ऐश्‍वर्या रॉयचा फोटो लावला. हे प्रकरण तपासणीसाठी मुक्ताईनगर तहसीलदार श्याम वाडकर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनीही ओके ओके रीमार्क देत ऑनलाईन प्रकरण प्रांताकडे पाठवले मात्र प्रत्येक प्रकरण बारकाईने हाताळणार्‍या प्रांतांच्या लक्षात ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित केंद्र चालकास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.