दोषींवर कारवाईसाठी रस्ता रोको : संबंधित कंपनीने दिले आर्थिक मदतीचे आश्वासन
मुक्ताईनगर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघा सुरक्षा रक्षक असलेल्या तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची महामार्गावरील खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर बुधवार, 25 रोजी मध्यरात्री घडली. पवन संजय जयकर (18) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (18, दोन्ही रा.मुक्ताईनगर) अशी मयत तरुणांची नावे आहेत. दरम्यान, कंपनीने सुरक्षा व्यवस्थेकडे डोळेझाक केल्याने तरुणांना जीव गमवावे लागल्याचा आक्षेप घेत नातेवाईकांनी घेत अज्ञात वाहचालकासह चौपदरीकरण करणार्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत जोपर्यंत संबंधी कंपनीचे अधिकारी मुक्ताईनगरत रुग्णालयात येत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती तर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महामार्गावर रस्ता रोको करण्यात आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली. यावेळी महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले तर रात्री आठ वाजेच्या सुमारास मृतदेह तब्यात घेण्यात आल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
झोपेतच सुरक्षा रक्षकांना चिरडले
पवन संजय जयकर (18) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (18) हे नात्याने चुलत आत्येभाऊ असलेलके तरुण आठ महिन्यांपासून ते ब्ल्यू स्टार सेक्युरीटी मॅनेजमेंट या कंपनीत सुरक्षगार्ड म्हणून काम करीत होते. मंगळवारी त्यांची रात्रीची ड्युटी चौपदरीकरण महामार्गावर पॉईंट क्रमांक 70 येथे डिव्हायडर मशीन येथे लावण्यात आल्यानंतर ते बुधवारी मध्यरात्री झोपले असताना अज्ञात वाहनाने दोघा तरुणांना चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोघ तरुणांच्या डोक्यावरून वाहन गेल्याने डोक्याचा व चेहर्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला तर जवळच उभ्या असलेल्या या तरुणांच्या मोटरसायकलचेही नुकसान झाले. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर अपघाताचे दृश्य पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घटना
दरम्यान, अपघाताची घटना बुधवारी मध्यरात्री खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. या ठिकाणी कोणतेही वळण रस्त्याचे फलक नसून या ठिकाणी रस्त्याचे काम करणार्या वाहनांची रात्री वर्दळ असते त्यामुळे कंपनीच्याच डंपरने हा अपघात घडला असावा, असा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. कंपनीच्या अज्ञात वाहनासह अज्ञात चालक आणि कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केला आहे. तरुणांची ड्युटी असलेल्या ठिकाणी सुरक्षा फलक लावणे गरजेचे असताना नियमांना हरताळ दाखवण्यात आली असून या भागात फक्त रस्त्यावर काम करणारी अवजड वाहने रहदारी करीत असल्याने कंपनीच्या वाहनांवर संशय व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत संबंधित कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत तरुणांचे शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाईकानी घेतली आहे.